वेगवेगळ्या अपघातांत सहा ठार

संगमनेर शहराजवळील कऱ्हे घाट व नगर तालुक्‍यातील चास शिवारातील घटना
संगमनेर/सुपा – पुणे- नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळील कऱ्हे घाटात ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघात तीन तर नगर- पुणे महामार्गावरील चास शिवारात हॉटेल संजय पॅलेस समोर कंटेनरला कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने स्विप्ट कारमधील तीन जण जागीच ठार झाले. बुधवारी मध्यरात्री झालेल्या या दोन वेगवेगळ्या अपघात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, पुणे- नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळील कऱ्हेघाटात ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघात गणेश सुखदेव दराडे (वय 29 रा. कऱ्हे), श्रीकांत बबन आव्हाड (वय 28 रा. दरेवाडी) हे दोघे संगमनेर तालुक्‍यातील असून अजय श्रीधर पेदाम (वय 27 रा. पांजरे, ता. चंद्रपूर) हे तिघे ठार झाले. हे तिघे कारमधून पुणे नाशिक महामार्गावरील नांदुर-शिंगोटे वरून संगमनेरच्या दिशेने जात असताना कऱ्हे घाटात कार पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिघा युवकांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी, पोलीस कॉन्स्टेबल रफिक पठाण, तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील तिघा युवकांना बाहेर काढले. या भीषण अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक मध्यरात्री बऱ्याचवेळ विस्कळीत झाली होती.

तर दुसऱ्या घटनेत नगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात हॉटेल संजय पॅलेस समोर कंटेनरला कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने स्विप्ट कारमधील तीन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला असून पुणे येथील रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे.

सुपा येथील ग्रामपंचायत सदस्य संदिप किसन पवार हे पारनेर येथील उद्धव ठाकरे यांची सभा आटपून बुधवारी सायंकाळी सुपा येथून आपल्या कारने तर चौघे जण वैयक्तिक कामासाठी नगरला गेले होते. काम आटपून पुन्हा सुप्याच्या दिशेने येत असताना रात्री 12.30 वाजता चास शिवारात हॉटेल संजय पॅलेस समोर आल्यानंतर समोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने संदिप किसन पवार (वय 44), भरत भाऊसाहेब ननवरे (वय 23) दोघे राहणार सुपा, ता.पारनेर, श्रीकांत गायकवाड (वय-20) राहणार चिंचोली पाटील, ता.पारनेर हे तीन जण जागीच ठार झाले.

तर एकाला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका तीव्र होता की यामध्ये स्विप्ट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संदिप पवार यांनी शिवसेनेकडून पंचायत समिती निवडणूक लढविली होती. अत्यंत शांत, संयमी आणि हुशार नेता हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संदिप पवार यांच्या अपघाताची माहिती मिळताच गुरुवारी सकाळी सुपा येथील व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)