वाल्हे -दौंडज (ता. पुरंदर) येथील मल्हारनगर येथे लांडग्यांनी कळपावर हल्ला करून सहा शेळ्या- मेंढ्यांचा फडशा पाडला. चार मेंढ्या गायब असल्याची माहिती मेंढपाळांनी दिली आहे. रविवारी (दि.31) रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास ही घटना घडली असून मेंढपाळांचे लाखाचे नुकसान झाले आहे.
मल्हानगर येथे मेंढपाळ पोपट साहेबराव दगडे व साधू भिवा दगडे यांनी गोठ्यात मेंढ्या बांधल्या होत्या. रात्री पाऊस सुरू असताना लांडग्याने मेंढ्यावर हल्ला केला.
यावेळी मेंढ्यांच्या आवाजाने मेंढपाळ जागे झाले. त्यावेळी लांडग्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता तो मेंढपाळावर चाल करून आला. त्यामुळे पाऊस व अंधार असल्यामुळे मेंढपाळ घाबरून मागे फिरले. दोन मेंढपाळांच्या तीन लहान व तीन मोठ्या अशा सहा शेळ्या व मेंढ्या असल्याची माहिती मेंढपाळांनी दिली. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते महादेव माने यांनी पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत उटगे यांना दिली. डॉ. उटगे व सहकारी संभाजी बंडलकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
यावेळी वन विभागाचे वन अधिकारी बाळासाहेब गोलांडे उपस्थित होते. राज्य शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी पोपट साहेबराव दगडे व साधू भिवा दगडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याची माहिती डॉ. उटगे व वनरक्षक बाळासाहेब गोलंडे यांनी दिली.