नवी दिल्ली – इजिप्तमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी विजयी झाले आहेत. सिसी यांनी इजिप्तच्या राजकारणावर गेल्या ९ वर्षांपासून आपली पकड बसवली आहे. अध्यक्ष पदी सलग तिसऱ्यांदा निवडल्यामुळे त्यांची ही पकड अधिकच घट्ट होणार आहे.
सिसी यांच्या विजयाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांंनी आज संध्याकाळी केली. या निवडणुकीमध्ये सिसी यांना एकूण ३ प्रतिस्पर्धी होते. मात्र त्यांच्यापैकी कोणीही त्यांच्या तोडीचा प्रतिस्पर्धी नव्हता. त्यामुळे एकाअर्थी ही निवडणूक एकतर्फी झाली होती.
या निवडणुकीतील मतांची टक्केवारी इजिप्तच्या इतिहासातील ऐतिहासिक अशी ठरली. इस्रायल आणि हमास दरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर इजिप्तमधील या निवडणुका लक्षवेधी ठरल्या होत्या. या युद्धामुळे इजिप्तचे नियंत्रण असलेल्या सुएझ कालव्यातील वाहतूक धोकादायक बनली आहे.
इजिप्तमधील महागाई ३० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. देशातील जनतेसमोर दारिद्र्य आणि बेरोजगारीचे संकट आहे. याशिवाय इजिप्तमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याची टीका पाश्चात्य देशांकडून केली जाते आहे. त्यामुळे सिसी यांच्यापुढे अनेक आव्हाने असणार आहेत.