पिंपरी – “साहेब मी पांजरापोळ, भोसरी येथून बोलतोय. आमच्या इकडं रात्रीच्या अंधारात कोणीतरी मृतदेह पुरला आहे. “तुम्ही लवकर या’, असा कॉल रविवारी (दि. 28) दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांना एका ठिकाणी जमीन खोदलेली दिसली. मग तहसीलदारांच्या उपस्थितीत तो खड्डा पुन्हा उकरला असता त्यात मेलेली मांजर दिसून आल्याने सर्वांनी कपाळावर हात मारून घेतला.
रविवारी बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची साप्ताहिक सुट्टी असते. मात्र होळीचा सण असल्याने आपल्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सकाळपासूनच सर्व पोलीस अधिकारी कर्तव्यावर हजर होते. दुपारी बारा वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एका नागरिकाने फोन केला. पांजरपोळ, भोसरी येथे रात्रीच्या अंधारात कोणीतरी मृतदेह पुरला आहे, अशी माहिती त्या नागरिकांनी दिली.
पोलीस नियंत्रण कक्षाने ही माहिती भोसरी पोलिसांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता खरोखरच त्या ठिकाणी जमीन खोदलेली आढळून आली. एवढेच नव्हे तर “त्या’ जागेवर हळद-कुंकू, गुलाल टाकण्यात आला होता. तसेच अगरबत्ती ही लावल्याचे दिसून आले. यामुळे कोणीतरी मृतदेह पुरला आहे, अशी शक्यता पोलिसांनीही व्यक्त केली.
कोणताही मृतदेह खड्ड्यातून उकरून काढायचा असल्यास त्यासाठी तहसीलदार व शासकीय कर्मचारी पंच म्हणून आवश्यक असतात. त्यानुसार भोसरी पोलिसांनी सुट्टीच्या दिवशी धावाधाव करून तहसीलदार आणि शासकीय कर्मचारी पंच म्हणून मिळवले. तोपर्यंत ही माहिती पांजरापोळ, भोसरी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. काही नागरिकांनी कोणाचा मृतदेह पुरला आहे हे पाहण्यासाठी गर्दी केली. रस्त्यावरून येणारे-जाणारेही थांबून कोणाचा मृतदेह आहे हे पाहण्यासाठी उत्सुक होते.
छिन्नविछिन्न मृतदेह असण्याची शक्यता लक्षात घेऊन ज्या जागेच्या आसपास कापड लावून आडोसा निर्माण केला. तरीही गर्दी कमी होत नव्हती. शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित पोलिसांनी संशयित ठिकाणी खोद कामास सुरुवात केली. पुढे कोणाचा मृतदेह दिसणार म्हणून सर्वांच्याच चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. काही फूट खोदल्यानंतर पोलिसांना त्या ठिकाणी एक मेलेले मांजर आढळून आले. त्यामुळे सर्वांनीच कपाळावर हात मारून घेतला