- आत्महत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
पिंपरी – डोक्यात गोळी लागून भाजप नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री चिंचवडेनगर चिंचवड येथे घडली.
प्रसन्न शेखर चिंचवडे (वय 21, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा तो मुलगा होता.
रविवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास जेवण झाल्यावर तो आपल्या खोलीत गेला. त्यानंतर पिस्तुलातून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्याच्या घरच्यांनी प्रसन्न याच्या खोलीकडे धाव घेतली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यास उपचारासाठी त्वरित थेरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
नगरसेविका करूणा चिंचवडे यांचे पती शेखर चिंचवडे यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. याच पिस्तुलातून गोळी सुटून हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र ही आत्महत्या आहे की अपघात याबाबत चिंचवड परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. याबाबत अधिक तपास सुरू आहे.