अंकुश महाडिक
101 वर्षांच्या मोहिते गुरुजींची भावनिक साद; नामदारांचे डोळे पाणावले
सणबूर – साहेब आपण मंत्री झालात, माझे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले. आता मला मरण आले तरी आनंद आहे. शेकडो कार्यकर्त्यांचे गर्दीला भेदणारे कापऱ्या आवाजातील हे शब्द होते, उमरकांचन येथील 101 वर्षांच्या शामराव मोहिते गुरुजी या ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकर्त्याचे. हे भावनिक शब्द ऐकून ना. शंभूराज देसाई यांचेसह उपस्थितांचे डोळे पाणावले.
सातारा, कराड तालुक्यातील व्यस्त कार्यक्रम संपवून ना. शंभूराज देसाई आपल्या ताफ्यासह मरळीच्या दिशेने रवाना झाले.नामदारांचा ताफा निवासस्थान जवळ पोचला आणि सकाळ पासून शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी नामदारांचे भोवती एकच गराडा केला. त्यावेळी गर्दीतून वृध्द व्यक्तीचा आवाज थेट नामदारांचे कानावर पोचला आणि कार्यकर्त्यांना बाजूला करत नामदार त्या आवाजाच्या दिशेने गेले असता खुर्चीत बसलेले मोहिते गुरुजी धडपड उठण्याचा प्रयत्न करत होते.
साहेबांनी स्वतः आधार देत गुरुजींना उठवले. साहेबांचा हात घट्ट पकडून गुरुजी कापऱ्या आवाजात बोलत होते. साहेब आपण मंत्री झालात, माझे स्वप्न पूर्ण झाले. आता मला मरण आले तरी आनंद आहे, हे भावनिक शब्द ऐकून काही वेळ काय बोलावे हे साहेबांना देखील सुचत नव्हते.पाणावलेले डोळे पुसत कसेबसे स्वतःला सावरत साहेब बोलले, आबा आपण इकडे कशाला आलात मी स्वतः आपल्या भेटीला उमरकांचनला येणार होतो, तसा निरोप मनोज जवळ दिला होता. परंतु आपले साहेब नामदार झाल्याचा आनंद 101 वर्षांच्या गुरुजींना शांत बसू देत नव्हता आणि भेटीसाठी आतुर झालेल्या गुरुजींनी थेट मरळीच गाठली.
लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचे पासून सलग तीन पिढ्या शंभूराज देसाई गटाबरोबर एकनिष्ठ काम करत असलेल्या मोहिते गुरुजींची तब्येत सप्टेंबर 2018 मध्ये अचानक खूप बिघडली. तेव्हा भेटीसाठी आलेल्या शंभूराज देसाई यांनी आबा लवकर बरे व्हा, असे म्हणताच साहेब तुम्ही मंत्री होत नाही, तोपर्यंत मी मरणार नाही. असे म्हणत गुरुजींनी दाखवलेली इच्छाशक्ती खूपच मोठी होती.
यानंतर गुरुजी यांचा 100 वा वाढदिवस जानेवारी 2019 मध्ये कुटुंबाने शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला होता. त्याप्रसंगी सुध्दा मोहिते गुरुजींनी साहेब मला आपण मंत्री झालेले पाहायचे आहे आणि हिच माझी शेवटची इच्छा आहे, असे बोलूनही दाखवलेले होते. आज इच्छा पूर्ण झाल्याचा परमानंद गुरुजींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसून येत होता.
लोकनेते साहेबांचे पासून तीन पिढ्या आबांनी देसाई गटाबरोबर काम केले आहे. एवढ्या वर्षाचे राजकीय प्रवासात कित्येक वेळा अपयश आले. परंतु गट सोडायचा विचार देखील कधी मनात आला नाही. आज शंभूराज देसाई मंत्री झाल्याचा आनंद आमच्या कुटुंबासाठी खूप मोठा आहे. कारण यानिमित्ताने आमच्या आबांचे स्वप्न देखील साकार झाले.
मनोज मोहिते, शंभूराज युवा संघटना ढेबेवाडी.