सराव शिबिर सोडून सिंधू इंग्लंडला

कौटुंबिक वादाचे वृत्त पालकांनी फेटाळले

हैदराबाद  -भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने येथे सुरू असलेल्या सराव शिबिरातून काढता पाय घेत थेट इंग्लंड गाठले आहे. तिच्या या अचानक निघून जाण्यामागे कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचे समजत असले तरी तिच्या पालकांनी त्यात तथ्य नसल्याचे सांगितले आहे.

भारतीय बॅडमिंटन संघटनेनेही सिंधूच्या अशा वर्तनावर आश्‍चर्य व्यक्त केले असून शिबिर सोडण्यापूर्वी तिने संघटनेला काहीही संदेश पाठवलेला नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. याबाबत संघटनेच्या सूत्रांनी काहीही बोलण्यास नकार दिला असून हा सिंधूचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगितले आहे.
यापूर्वीही तिने असेच वर्तन केले होते, असेही समजत आहे.

या मागे तिच्या कुटुंबीयांशी झालेल्या वादामुळेच तिने काही काळ स्वतःसाठी वेळ देता यावा अशी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. इंग्लंडमध्ये पुढील किमान दोन महिने राहणार असल्याचे तिने पी. गोपीचंद अकादमीतील आपल्या प्रशिक्षकांना सांगितले असल्याचे समजत आहे. गेले दहा दिवस सिंधू इंग्लंडमध्ये असल्याचेही मंगळवारी उघड झाले. 

तिने कोणतेही कारण न देता सराव शिबिरातून निघून जाण्याचा घेतलेला निर्णय भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी धक्कादायक ठरला आहे. यावर सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहेत. सिंधूसह तिचे वैद्यकीय तज्ज्ञ व आहारतज्ज्ञही इंग्लंडला रवाना झाले होते व आता तेच पुढील घडामोडी कळवतील, अशी अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली आहे.

सिंधूने केला खुलासा
कौटुंबिक वादाने नव्हे तर तंदुरुस्ती व मन:शांतीसाठी इंग्लंडला आले असून कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असा खुलासा सिंधूने केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.