देशातल्या 52 रुग्णालयांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध होणार
पुणे – सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची उभारणी करण्यासाठी केंद्र सरकार “आयुष्मान सहकार’ योजना राबविणार आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून सहकारी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशातल्या 52 रुग्णालयांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी सोमवारी (दि.19) “आयुष्मान सहकार’ ही विशेष योजना जाहीर केली. यांतर्गत “एनसीडीसी’च्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
सहकारी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशातल्या 52 रुग्णालयांमध्ये मिळून 5,000 खाटांची सुविधा आहे. या आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये गुंतवणूक करणे, तंत्रज्ञानाचा विनियोग करणे, मनुष्यबळ विकास करणे, वैद्यकीय बहुलतेला प्रोत्साहन देणे, सर्वांना परवडणारी आरोग्य सेवेत शेतकरी बांधवांना समाविष्ट करून घेणे, यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सर्वंकष दृष्टिकोनातून रुग्णालये, आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, परिचारिका शिक्षण, निम-वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विमा आणि आयुषसारख्या समग्र आरोग्य व्यवस्था यांचाही यामध्ये समावेश असणार आहे.
‘आयुष्मान सहकार’ योजना निधीमुळे सहकारी रुग्णालयांना वैद्यकीय तसेच आयुष शिक्षण घेण्यासाठी मदत मिळणार आहे. तसेच कोणतीही सहकारी संस्था आरोग्य निगडित उपक्रम राबविण्यासाठी आपल्या कायदेशीर तरतुदींमध्ये सुधारणा करून “एनसीडीसी’कडून निधी घेवू शकणार आहे. राज्य सरकारे किंवा केंद्र शासित प्रशासनांमार्फत किंवा थेट निधी सहकारी संस्थांना देण्यात येणार आहे. तसेच इतर स्त्रोतांकडून अनुदान देण्यात येवू शकते, अशी महिती केंद्रीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात आली.
सहकारी संस्थांना “आयुष्मान सहकार’ योजनेचे फायदे
– आरोग्य सेवांची स्थापना
– आरोग्य सेवा संस्थांचे आधुनिकीकरण,विस्तार आणि सुधारणा करणे
– रुग्णालयांचे नूतनीकरण
– आरोग्य सेवा आणि आरोग्यविषयक शिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करणे