नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे. कॅनडात राहत असलेल्या गँगस्टर लखबीर सिंग लांडा याने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला थेट धमकी दिली आहे. स्पेशल सेलचे 12 अधिकारी मुसेवाला हत्याकांडा प्रकरणी दहशतवादाच्या कनेक्शनची चौकशी करत आहेत. या पोलीस अधिकाऱ्यांना धमकी मिळाल्यानंतर त्यांना सुरक्षा देण्यात आली असून या पोलीस अधिकाऱ्यांना 24 तास सुरक्षा राहणार आहे.
पोलीस कमिश्नर संजय अरोरा यांनी स्पेशल सेल सीपी हरगोविंदर धालीवाल, डीसीपी (स्पेशल सेल) मनिषी चंद्र आणि राजीव रंजन यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या पोलीस अधिकाऱ्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल हे अँटी टेरर युनिट आहे. राजीव रंजन हे स्पेशल सेलच्या दोन युनिटला लीड करत आहेत. तर मनिषी चंद्रा पोलीस आयुक्तांचे कर्मचारी अधिकारी (एसओ) म्हणून कार्यरत आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांशिवाय चार एसीपी आणि पाच पोलीस निरीक्षकांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. एक सशस्त्र जवान 24 तास या पोलीस अधिकाऱ्यांच्यासोबत तैनात असणार आहे.
लखबीर सिंग लांडा हा मूळचा पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो 2017पासून कॅनडात वास्तव्याला आहे. तो पाकिस्तानच्या लाहोरमधील रुग्णालयात मृत्यू पावलेल्या हरविंदर रिंदाचा साथीदार होता. हरविंदर रिंदा हा बीकेआय प्रमुख वाधवा सिंग आणि आयएसआयचा जवळचा होता.
गेल्याच महिन्यात लखबीरसिंग लांडाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिल्ली पोलिसांना धमकावले होते. हॅप्पी संघेरा बाबत मी पोस्ट करत आहे. हॅप्पी संघेरा हा स्पेशल सेलचा मास्टरमाइंड होता आणि रॉ एजंटही होता. आम्ही त्याला युरोपमध्ये कंठस्नान घातले होते. तुमच्या सर्वांचे फोटो आमच्याकडे आहेत, हे मला दिल्ली पोलिसांना सांगायचे आहे. तुम्ही जर पंजाबच्या गल्लीबोळातही दृष्टीस पडला तर चांगले होणार नाही. अन्यथा आम्ही तुमच्या एरियात घुसून तुम्हाला धडा शिकवू, अशी धमकी या सोशल मीडियातील पोस्टमधून देण्यात आली होती.