मुंबई – बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे आज वयाच्या 40व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या निधनाने मनोरंजन विश्वाला मोठा हादरा बसला आहे. सिद्धार्थचे निधन हे हृदय विकाराच्या झटक्याने झाले असल्याचे आधी सांगण्यात आले होते मात्र सिद्धार्थच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आले नसून नेमका कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हे अद्याप कळू शकले नाही.
यासंदर्भात मुंबई पोलीसांनी माहिती देताना सांगितले की, सिद्धार्थचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आता हे सांगणे कठीण आहे की त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला. मेडिकल आणि पोस्ट मार्टम अहवालानंतर त्याचप्रमाणे सिद्धार्थसह राहणाऱ्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतर यावर स्पष्ट काही सांगता येईल. अशी पोलीसांनी माहिती दिली आहे.
सिद्धार्थच्या शरीरावर आत्तापर्यंत कोणत्याही जखमा वा व्रण आढळून आलेले नाहीत. पोलिस घाईघाईने कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू इच्छित नाही. त्यामुळे त्यांना पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.