विश्रांतवाडी (प्रतिनिधी) – धानोरीतील कमल फाऊंडेशनच्यावतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा मंगलमय आनंदोत्सव सोहळ्यानिमित्त अभिषेक, होमहवन,भजन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत टिंगरे व भाजपा महिला मोर्चा वडगावशेरी मतदारसंघाच्या अध्यक्षा तथा माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी केले होते. धानोरी मुख्य रस्त्यावरील चैतन्य गगनगिरी मंगल कार्यालयाशेजारच्या श्रीकृष्ण मंदीरात सोमवारी(दि.२२) सकाळी अभिषेक व पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या मंगलमय सोहळ्याप्रसंगी माजी आमदार जगदीश मुळीक, माऊली टिंगरे, राजाभाऊ टिंगरे, चंद्रकांत जंजिरे, नितीन बर्गे, हनुमंत बर्गे, गुणवंत देशमुख, विजय उत्तेकर, सुनील गायकवाड, जगदीश शिंदे, अतुल वैराट, सुमित सूर्यवंशी, अजय महाजन, आशा टिंगरे, कीर्ती बहिरट, अनिता टिंगरे, शामाताई जाधव, पूजा मंडवाले, मीरा भोंग, गौरी काळभोर, शुभांगी काळभोर, अनुराधा गलांडे, प्रगती अकिम, पल्लवी धापटे, पूनम वैराट तसेच वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील व कळस-धानोरी-विश्रांतवाडी (प्रभाग क्र.१) परिसरातील श्रीरामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीकृष्ण मंदिर परिसरासह कार्यक्रमस्थळी नयनरम्य विद्युतरोषणाई करण्यात आली होती. तसेच आकर्षक रांगोळीचा सडा टाकण्यात आला होता. सायंकाळी शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळी साजरी करण्यात आली. महाआरतीनंतर रात्री उशिरापर्यंत अखंडित सुरू असलेल्या महाप्रसादाचा १० हजार पेक्षा जास्त रामभक्तांनी लाभ घेतला.
धानोरीतील जिवनज्योती महिला भजनी मंडळ, भैरवनगरमधील श्रीगणेश महिला भजनी मंडळ यांनी प्रभू श्रीरामाची भजने गायली. अयोध्येतील कार्यक्रम सर्वांना एलईडी द्वारे लाईव्ह दाखवण्यात आला. याठिकाणी उपस्थित सर्वजण मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन झाले होते. महिला भगिनींनी प्रभू श्रीरामांच्या गाण्याच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला.