वाघोली : जरांगे-पाटलांच्या मोर्चामुळे २३ आणि २४ जानेवारीला पुणे नगर रोडवरील वाहतुकीत मंगळवारी दुपारपासूनच मोठे बदल करण्यात आले आहेत. बीड, नगर जिल्ह्यातून मुंबईला जाणारा हा मोर्चा पुणे-नगर रोडमार्गे जाणार आहे. मंगळवारी (ता. २३ जानेवारी) हा मोर्चा शिरूर येथून कोरेगाव भीमामार्गे वाघोली येथे मुक्कामासाठी येणार असून बुधवारी (ता. २४ जानेवारी) मोर्चा नगर रोडवरून पुणे शहरामार्गे लोणावळ्याच्या दिशेने मार्गस्थ होईल.
मराठा समाजाचा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने मराठाबांधव सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी महामार्गासह काही रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे-नगर रोडवरील वाहतुकीत असा असेल बदल
मोर्चा वाघोली येथे मुक्कामी असल्याने मंगळवारी दुपारपासूनच अहमदनगर येथे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून, तसेच कोल्हापूर, सातारा येथून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा हडपसरमार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला – न्हावरे- शिरूर मार्गे जातील.
वाघोली, लोणीकंद मार्गे नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथून केडगाव चौफुला न्हावरा मार्गे शिरूर ते अहमदनगर जातील, तर पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा चौक, पुढे सोलापूर रोडने यवत केडगाव चौफुला – न्हावरे -शिरूर मार्गे जातील.
हा मोर्चा २४ जानेवारीला पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधून पुढे जाणार आहे. त्यामुळे या दिवशी अहमदनगरकडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा येथून केसनंद, थेऊरमार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील.वाघोली परिसरामधील वाहने वाघोली आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक-केशवनगर-मुंढवा चौक अशी वळविण्यात येणार आहेत.
पुणे शहरामधून नगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, वाघोली मार्गे नगरकडे असे जाता येईल. हा मोर्चा जसा पुढे जाईल, तसतशी वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे वाहतूक उपायुक्त बोराटे यांनी सांगितले.
वाघोलीतील मुक्कामाच्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी
मनोज जरांगे पाटील व मोर्चातील सर्व मराठा बांधवांचा २३ जानेवारीचा मुक्काम वाघोली-खराडी सीमेवरील चोखी ढाणी रोडच्या मैदानावर होणार आहे. त्यामुळे मैदानाचे सपाटीकरण, आरोग्य सुविधा, प्रसाधन सुविधा उपलब्ध करून देणे, मोर्चातील मराठा बांधवासाठी जेवण, नाष्टा, पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वाघोली, खराडी, वडगावशेरी, लोहगाव परिसरातील स्थानिक मराठा बांधव मोठ्या संख्येने झटत आहेत. करण्यात येणाऱ्या कामांसाठी आर्थिक व वस्तू रूपाने मदत करून मोर्चेकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे शहर पोलिसांनी देखील कडक पोलीस बंदोबस्त ठेवला असून त्यांच्या मोर्चातील मराठा बांधवांचा मुक्काम व पुढील दौरा सुरळीतपणे सुरु राहील याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे.