सासवडचे श्री श्‍वेतांबर जैन मंदिर

ऐतिहासिक शहरातील अध्यात्मिक वारसा

ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात पुरंदर तालुक्‍याने अवीट ठसा उमटविला आहे. याच सासवड भूमीला संत सोपानकाकांचा वारसा आहे. शहरातील बाजारपेठेतील श्री श्‍वेतांबर जैन मंदिराची स्थापना सन 1972 मध्ये करण्यात आली. त्यानंतर जैन बांधव मोठ्या भक्‍तीभावाने पूजा, अर्चा करतात. वर्षभरात भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव, चातुर्मास पर्व सोहळा, पर्युषण आदी उत्सव साजरे केले जातात.

शहरातील सर्व समाजबांधव गुण्या गोविंदाने मनोभावे आराधना करतात. त्याचबरोबर जैन समाजबांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सासवडशी खऱ्या अर्थाने ऋणानुबंधाचा धागा विणला आहे. चातुर्मास सोहळ्यानिमित्त दैनिक प्रभातच्या वतीने मंदिराचा इतिहास व चातुर्मास पर्वामधील महत्व याविषयी माहिती देत आहोत.

सासवड शहरात पूर्वी इस्लामपूर (सांगली) येथून भगवान पार्श्‍वनाथांची मूर्ती आणण्यात आली. पूर्वीच्या काळी 1972 मध्ये घर मंदिराची उभारणी भाग्यवंती असलचंदजी सोळंकी यांच्या घरात करण्यात आली. त्यावेळी मीश्रीमलजी सोळंकी, प्रकाशशेठ सोळंकी, मूलतानमलजी ओसवाल, भिकमचंदजी ओसवाल, ताराचंदजी सोळंकी, छगनजी जुहारमलजी सोळंकी यांच्या उपस्थितीत झाली.

1982 मध्ये जैन घर मंदिराचे पुजारी म्हणून राजू काका अत्रे यांनी दोन वर्षे काम पाहिले. शांताबाई बिरदीचंदजी नवलाखा, माणिकचंदजी मुथा, पोपटलालजी डाकले, सुभाषभाऊ नवलाखा परिवार यांनी विहारासाठी आलेल्या साधू- साध्वीजींचे मनोभावे व्यवस्था केली. (स्व) प्रकाशशेठ सोळंकी यांचा मुलगा रमेश, विवेक, कमलेश सोळंकी यांनी राजेंद्र जैन भवनची जागा जैन समाजासाठी दान दिली. त्यांच्या दातृत्वातून जैन मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली.

साधू- साध्वीजी विहारात आल्यानंतर त्यांना विश्रांतीसाठी त्यांच्या हॉलचा उपयोग होत आहे. 2001 मध्ये कुंथुनाथ जैन मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली. राजस्थान (राणकपूर) येथून कुंथुनाथांची मूर्ती आणली आहे. 2003 मध्ये जैन मंदिराचा सर्व विधिवत कार्यक्रम करण्यात आला. जैन संघाची सध्याची जागा डाकले यांच्याकडून 1995 मध्ये घेण्यात आली.

मंदिराच्या उभारणीसाठी छगनलाल सोळंकी, मुन्ना मेहता, ललित मेहता, पारसकाका सोळंकी, शांतीलाल सोळंकी (पुणे), भरतभाई परमार (पुणे), घेवरचंदजी कटारिया (परिवार) यांनी विशेष सहकार्य केले. डॉ. संचेती, कचरदासजी बागमार यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. प्रा. राजमलजी धोका, आनंद धोका (मुंबई), कर्नावट (सर), ईश्‍वरभाऊ बागमार, रायचंदजी कुवाड, शांतीलालजी बेदमुथा यांनी सहकार्य केले. (स्व) डॉ. सुभाषचंद्र बोत्रा यांनी सहकार्य केले होते. सासवड जैन संघाचे माजी अध्यक्ष (स्व) बिरदीचंजी लालचंदजी नवलाखा यांचे सहकार्य मिळाले होते.

कल्याणभाई सोमपुरा (राजस्थान) यांनी संगमरवरी काम केले आहे. मंदिराची विधिवत पूजा मनसुखभाई (मालेगाव) यांनी केली. धनराज शर्मा व ललित शर्मा यांच्या वतीने धार्मिक भक्‍तीसंगीताचा कार्यक्रम सादर केला जात आहे. सासवड शहरात 1008 चिंतामणी पार्श्‍वनाथ दिगंबर जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, उपक्रम भक्‍तीमय वातावरणात साजरा केले जातात. यावेळी दीपक नागरकर, रतनदादा नरते, अशोक गरबे, संदीप कुरमुडे, धनपाल पाटील, दीपक पालंबे, श्रीकांत गीते यांचे सहकार्य मिळत आहे.

भिवरी येथे जैनम जयती साधना तीर्थ आहे. याठिकाणी मंजुश्रीजी म. साहेब (साध्वीजी) यांचे वास्तव्य आहे. हे साधना तीर्थ पुरंदर तालुक्‍यातील निसर्गाच्या सानिध्यात साकारले आहे. भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्या वतीने अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यात विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.

सामाजिक उपक्रम: सासवड शहरासह पुरंदर तालुक्‍यात जैन बांधवांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. गरजू, वंचित घटकांना शिक्षणांच्या प्रवाहात आणण्यासाठी दातृत्वाची ओंजळ रिती केली जात आहे. तसेच संसारपयोगी साहित्य, धान्य वाटप आदी उपक्रमांची वर्षभर रेलचेल असते. हा सामाजिक वसा अविरतपणे सुरू आहे.

कार्यकारी मंडळ: दिनेश ऊर्फ मुन्नाशेठ सोळंकी, रमेश सोळंकी, रमेश ओसवाल, बाबूशेठ सोळंकी, अशोक ओसवाल, कपिल सोळंकी. व्यवस्थापन- सकल श्री जैन संघ, सासवड. पुजारी- धनराज शर्मा.

– शब्दांकन : गिरीश कर्नावट (सासवड)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.