करोनात ऑक्‍सिजनची गरज भासलेल्यांना धोका कायम

– सागर येवले

पुणे – करोनामुक्‍त झालो म्हणजे सुटलो, अशा भ्रमात राहणाऱ्यांचा धोका कायम असल्याचा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. सौम्य लक्षणे असलेल्यांना बरे झाल्यानंतर फारसा धोका नाही. परंतु, ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असणाऱ्यांनी तीन महिन्यांनंतर आपल्या छातीचा सीटी स्कॅन करून घ्यावा, असा सल्ला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी दिला.

सिटी स्कॅनचा अहवालामध्ये फुफ्फुसाची स्थिती भयावह असू शकते, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. जुने आजार असलेल्या व्यक्‍तींना करोनातून बरे झाल्यानंतर आरोग्याच्या अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. करोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्यांमध्ये अशा तक्रारीचे प्रमाण अधिक आहे. डॉ. धनंजय केळकर यांच्याशी “दैनिक प्रभात’ने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी धक्‍कादायक खुलासे केले.

ते म्हणाले, कोविड-19 अद्याप संपलेला नाही. करोनाबाधित आणि मृत्यूसंख्या कमी होईल; परंतु पुढील तीन महिने या संसर्गाचे भय राहण्याची शक्‍यता आहे. कोविड होऊन गेल्यानंतर काय? याचे ठोस उत्तर अद्याप कोणाकडेच नाही. मंगेशकर रुग्णालयात आतापर्यंत अकरा हजार बाधितांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी सुमारे दोनशे ते तीनशे रुग्णांमध्ये हृदय, हात-पाय आणि मेंदूमध्ये रक्‍ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. त्यामुळे हृदयावर ताण येऊन व्यक्‍ती दगावण्याची भीती असते.

सौम्य लक्षणे असलेल्यांना त्रास झाल्याचे अद्याप समोर आले नाही. तसेच लक्षणेच न आढळलेल्या परंतु करोना होऊन गेलेल्यांना प्रतिकारशक्‍ती चांगली असल्यामुळे भीती नाही. मात्र, करोनाची तीव्र लक्षणे, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर लागला आणि जुना आजार असणाऱ्या बाधितांनी काळजी घ्यायला हवी, असा सल्ला डॉ. केळकर यांनी दिला.

करोना बरा होऊन घरी सोडल्यावर तीव्र लक्षणे आणि जुना आजार असलेल्या रुग्णांमध्ये अनेक समस्या जाणवतात. त्यामध्ये रक्‍ताच्या गुठळ्यांमुळे हृदयविकाराचा झटका येणे, अर्धांगवायू होण्याची भीती असते. हात-पाय गळून गेल्यासारखी अन्य कोणतीही लक्षणे दिसल्यास रुग्णांनी तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. मानसिक संतुलनही बिघडते असे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दीनानाथ रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉक्‍टर, फिजिओथेरेपिस्ट आणि मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे. 

– डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.