6 लाख चौरस फूट क्षेत्रातील मंदिराचा खर्च 800 कोटी रुपये
कोलकाता – पश्चिम बंगाल मध्ये जगातील सर्वात मोठ्या कृष्ण मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. सुमारे सहा लाख चौरस फूट क्षेत्रातील या मंदिराच्या बांधकामाला आठशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरापासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर नदीया जिल्ह्यातील मायापुर या शहरामध्ये हे भव्य मंदिर बांधण्यात येत आहे.
या मंदिराचे एकूण सात मजले असून 2023 च्या अखेरीपर्यंत या मंदिराचे 80 टक्के बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यानंतर मंदिर खुले केले जाईल. आत्तापर्यंत या मंदिराचा तळमजला बांधून पूर्ण झाला आहे. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ म्हणजेच इस्कॉनतर्फे हे मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिर निर्माणाचे चेअरमन अमेरिकन नागरिक आल्फ्रेड फोर्ड आहेत. ते फोर्ड या प्रख्यात मोटार कंपनीचे संस्थापक मालक आहेत. इस्कॉनशी संबंध आल्यावर त्यांनी स्वतःचे नाव अमरीश दास असे केले आहे.
मायापूर येथील हे कृष्ण मंदिर इस्कॉनचे अध्यात्मिक मुख्यालय म्हणूनही काम करणार आहे. हे मुख्य मंदिर बारा एकर परिसरात बांधण्यात येणार असून त्याच्या समोरील बाग 45 एकरमध्ये आहे. या मंदिरातील कीर्तनाचा हॉल दीड एकरामध्ये बांधण्यात आला असून त्यामध्ये एका वेळी दहा हजार पेक्षा जास्त लोक भजनाचा आनंद घेऊ शकतात.
या मंदिराची एकूण उंची 350 फूट असून घुमटाचा व्यास 177 फूट आहे. राजस्थान आणि व्हिएतनाम मधील व्हाइट मार्बल फ्रान्समधून रेड मार्बल आणि इटली मधून ब्लू मार्बलचा वापर करून हे मंदिर बांधण्यात येणार आहे. त्या मंदिराच्या आतल्या भागामध्ये अनेक ठिकाणी हे विश्व कसे तयार झाले याबरोबरच अंतराळातील अनेक गोष्टीची माहिती दिली जाणार आहे