पुणे – श्रेयस माणकेश्वर याने दोन गटात उपांत्य फेरीकडे आगेकूच केली आणि फिनिक्स चषक टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपदाच्या आशा कायम ठेवल्या. ही स्पर्धा जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने फिनिक्स फ्लायर स्पोर्टस अकादमीतर्फे मेट्रो सिटी क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. तेरा वर्षाखालील मुलांच्या गटात श्रेयस याने अग्रमानांकनास साजेसा खेळ करीत आयुष पाटील याचा 11-5,11-3,11-8 असा धुव्वा उडविला.
त्याने टॉप स्पिन फटक्यांचा सुरेख खेळ केला. याच गटात अनंत करमपुरी याने आश्चर्यजनक विजयाची परंपरा राखताना द्वितीय मानांकित खेळाडू अली कागडी याला निष्प्रभ केले आणि उपांत्य फेरी निश्चित केली. एकतर्फी झालेली ही लढत त्याने 11-2,11-3,11-5 अशी जिंकली याच गटात चौथ्या मानांकित सागर बहुलेकर याला मात्र दर्शन कंदलकर याच्याविरुद्ध विजय मिळवताना झगडावे लागले. त्याने हा सामना 11-5,5-11,11-6, 7-11,11-9 असा जिंकला.
मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात सातवा मानांकन असलेल्या श्रेयस याने द्वितीय मानांकित सुशील आवटे याला 5-11,11-8, 11-5,11-9 असे चकित करीत उपांत्य फेरी गाठली. या गटात अव्वल मानांकित कौस्तुभ गिरगावकर यानेही अपराजित्व राखले. त्याने निषाद लेले याचा 11-7,11-7,11-4 असा सरळ तीन गेम्समध्ये पराभव केला. त्याने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. आदित्य सामंत याने अश्विन कुमार गुरु या अनुभवी खेळाडूला पराभूत करीत उपांत्य फेरीत धडक मारली ही लढत त्याने 13-11,11-5,13-11 अशी जिंकली.