पुणे – पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित व ट्रूस्पेस, कोरस व एसपी यांनी प्रायोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य 11 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात मुंबई उपनगरच्या विराज राणे याने तर, मुलींच्या गटात मायशा परवेझ या खेळाडूंनी आपली आघाडी कायम ठेवत विजेतेपद संपादन केले.
कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृह येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत खुल्या गटात मुंबई उपनगरच्या विराज राणेने कोल्हापूरच्या अभय भोसलेला 12 चालींमध्ये बरोबरीत रोखले. विराज याने 8 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. विराज हा न्यु होरायजन पब्लिक स्कूलमध्ये सहावी इयत्तेत शिकत आहे. पुण्याच्या आरुष डोळसने नागपूरच्या सेहजवीर सिंग मरासचा पराभव करून 7.5 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. पुण्याच्या शाश्वत गुप्ताने तिसरा क्रमांक पटकावला.
अश्वमेध सभागृह येथे पार पडलेल्या मुलींच्या गटात नवव्या फेरीत मुंबई उपनगरच्या मायशा परवेझने मुंबई शहरच्या त्वेशा जैनचा पराभव करून 8.5 गुणांसह विजेतेपद पटकावले. मायशाने इटालियन पद्धतीने डावास सुरुवात करत त्वेशावर 50 चालीमध्ये मात केली. मायशा ही बिलाबॉंग इंटरनॅशनल शाळेत सहावी इयत्तेत शिकत आहे. नागपूरच्या वेदिका पाल हिने मुंबई उपनगरच्या अन्विता ठकारचा पराभव करून 7.5 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. नागपूरच्या दिव्यांशी खंडेलवालने कोल्हापूरच्या सिद्धी कर्वेचा पराभव करून 7 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे उपाध्यक्ष व ट्रुस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल, स्नार्क पावर लिमिटेडच्या इंजिनिअरिंग व सप्लाय चेन विभागाचे व्यवस्थापक रोहीत मदन, पीडीसीसीचे सचिव डॉ.संजय करवडे, पीडीसीसीचे सदस्य हर्निश राजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, डॉ. दीपक रिपोटे, चीफ आरबीटर दीप्ती शिदोरे, राजेंद्र शिदोरे, स्पर्धा संचालक विनिता श्रोत्री आदी उपस्थित होते.