नवी दिल्ली – नवी दिल्लीत गतवर्षी झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात खळबळ उडाली. होती. यानंतर पुन्हा एकदा गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. त्याचे अनेक तुकडे करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.
उड्डाणपुलाजवळ मानवी शरीराचे काही तुकडे असल्याची माहिती बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले असल्याचे सांगण्यात येते.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. महिलेचे वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येते, अशी माहिती पोलीस आयुक्त सागरसिंग कलसी यांनी दिली.
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अधिक पुराव्यासाठी परिसरात शोध मोहिम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.