नवी दिल्ली – दिल्ली मेट्रोच्या काही स्थानकांमध्ये खलिस्तानवादी संदेश लिहिल्याचे आढळून आले आहे. दिल्लीमध्ये पुढील महिन्यात “जी-20’ची मुख्य परिषद होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्ली आणि राजधानी परिसरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था केली जात असतानाच खलिस्तानवादी संदेश आढळून आल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेपुढे नवीन आव्हान उभे ठाकले आहे.
काही अज्ञात व्यक्तींनी पाच मेट्रो स्थानकांमध्ये खलिस्तानवादी संदेश लिहिल्याचे आढळून आले आहे. “दिल्ली बनेगा खलिस्तान’ आणि “खलिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर रंगवल्याचे आढळून आले आहे. शिवाजी पार्क, मदिपूर, पश्चिम विहार, उद्योगनगर आणि महाराजा सूरजमल स्टेडियम येथील मेट्रो स्थानकांमध्ये या घोषणा लिहिल्याचे आढळून आले आहे.
याशिवाय नान्गलोई स्कूलच्या भिंतीवरदेखील अशाच घोषणा लिहिल्या आहेत. यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, या घोषणा लिहिणाऱ्यांना सीसीटीव्हीच्या आधारे शोधले जात आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या रंगवलेल्या घोषणांचा एक व्हिडिओ “सिख फॉर जस्टीस’ या बंदी घातलेल्या संघटनेने प्रसिद्धदेखील केला आहे. या व्हिडिओमध्ये “एसएफजे’चा प्रवक्ता गुरपतवंत सिंग पन्नून याने “जी-20′ देशांना उद्देशून संदेश दिला आहे. जेव्हा 10 सप्टेंबरला दिल्लीत “जी-20’ची परिषद होईल, तेव्हाच कॅनडामध्ये खलिस्तान सार्वमत आयोजित केले जाईल, असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.