Marathi Celebrities : सध्या 2023 या चालू वर्षाचा शेवटचा महिना सुरु असून, काही दिवसांतच हे वर्ष देखील संपणार आहे. काहींसाठी यंदाचे वर्ष अतिशय खास ठरले तर, काहींनी आपल्या जवळच्या व्यक्तींना निरोप दिला. असच काहीसं मराठी सिनेसृष्टीत देखील पाहायला मिळालं आहे. यंदाच्या 2023 वर्षात मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्यातून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीसाठी यंदाचे वर्ष दुःखाचे ठरले आहे.
2023 मध्ये या कलाकारांनी घेतली एक्झिट !
भालचंद्र कुलकर्णी –
18 मार्च 2023 रोजी ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. माहेरची साडी या सिनेमात त्यांनी अलका कुबल यांच्या वडिलांची भुमिका साकारली होती.
सुलोचना लाटकर –
4 जून 2023 हा दिवस मराठी इंडस्ट्रीसाठी वाईट ठरला कारण अभिनेत्री सुलोचना लाटकर याचं निधन झालं. मराठी सिनेसृष्टीची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच न भरून निघणारी आहे.
रवींद्र महाजनी –
मराठी इंडस्ट्रीला हादरवून सोडणारा 15 जुलै हा दिवस कोणीच विसरू शकत नाही. मराठी सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह पुण्याच्या तळेगावातील फ्लॅटमध्ये आढळून आला. वयाच्या 77व्या वर्षी त्यांचं कार्डियक अरेस्टनं निधन झालं.
जयंत सावरकर –
मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते ज्यांनी त्यांच्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत मराठी नाटक, मालिका, सिनेमा आणि ओटीटी अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करून नाव कमावलं. असे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं 24 जुलै 2023 रोजी निधन झालं.
नितीन चंद्रकांत देसाई –
2 ऑगस्टचा दिवस देखील अनेकांच्या लक्षात असेल. या दिवशी मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. नितीन देसाई यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच भरून न निघणारी आहे.
सीमा देव –
मराठीतील एव्हरग्रीन जोडी म्हणजे रमेश देव आणि सीमा देव. रमेश देव यांच्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 24 ऑगस्ट 2023रोजी अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं.
मिलिंद सफाई –
सीमा देव यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंग सफाई यांच 25 ऑगस्ट 2023 रोजी निधन झालं. मिलिंद यांना कॅन्सरचं निदान झालं होतं.
रवींद्र बेर्डे –
मराठी सिनेमां मधील उत्कृष्ट अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे 13 डिसेंबर 2023 रोजी निधन झाले. रवींद्र बेर्डे यांनी मराठी सोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला होता. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.