नारायणगाव – नारायणगाव मध्ये पेट्रोल-डीझेलच्या टंचाईमुळे सोमवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे. पेट्रोल पंपावर अचानक पणे पेट्रोल डिझेल शिल्लक नाही असे फलक लागल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झालेली दिसून येत होती.
नारायणगावला कृषी उत्पन्न समितीचा उपबाजार असल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईला भाजीपाल्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे इंधन टंचाईचा भाजीपाला वाहतुकीलाही फटका बसला असून शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे. इंधन न मिळाल्याने अनेक वाहनधारकांना माघारी फिरून जावे लागले. पेट्रोल पंपावर अचानकपणे इंधनाची विक्री थांबल्याने ही कृत्रिम टंचाई तर नाही ना अशी शंका वाहनधारकांच्या मनात निर्माण झाली आहे.
इंधन पुरवठा करणाऱ्या डेपोला पंप मालकांनी गुरुवार (दि. 19) च्या अगोदर इंधनाची ऑर्डर करून 24 तासांच्या आत पैसे पुरवठा डेपोला पाठवले तरी पंपावर इंधनाचा पुरवठा केला जात असे; परंतु इंधन पुरवठा करणाऱ्या डेपोने शुक्रवारी (दि. 20) नियमांमध्ये अचानक बदल करून पंप मालकांनी इंधनाची मागणी करताना अगोदर पैसे जमा करावे नंतरच मालाचा पुरवठा केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे शुक्रवारपासून नियमांमध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे पंपधारकांना इंधन पुरवठा करणाऱ्या डेपोतून इंधनाचा पुरवठा करण्यात आला नाही.
नारायणगावातील पेट्रोल पंपावर रोज 10 हजार लिटर पेट्रोल व 25 हजार लिटर डीझेलची विक्री होत असल्याने पंप मालकांना तशी इंधनाची मागणी करावी लागते. तरच पंप सुरळीत सुरू राहू शकतो. सध्या खासगी पेट्रोल पंपावरून दररोज नारायणगाव एसटी डेपोला तीन हजार लिटर डीझेल पुरवावे लागत आहे.
मागणीनुसार पुरवठा नाही
अचानकपणे सर्वच पेट्रोल पंप बंद झाल्याने चौकशी केली असता पंपधारकांना लोणी काळभोर व मनमाड येथील पुरवठादारांकडून मागणीनुसार पेट्रोल डीझेलचा पुरवठा होत नाही. पेट्रोल कंपन्यांना विक्री करणे परवडत नसल्याने कंपन्यांनी 25 टक्के विक्री कमी केली आहे. सातत्याने इंधन दराबाबत बदलणारे धोरण त्याला कारणीभूत आहे. पंपधारकांना इंधन पुरवठा करणाऱ्या डेपोतून ते स्वतःच्या गाड्या पाठवत नसल्याने पंप मालकांना त्यांच्या स्वतंत्र गाड्यांची व्यवस्था करावी लागत आहे.
“केंद्रसरकार आणखी दोन रुपयांनी पेट्रोल-डीझेलचे दर व्हॅटमध्ये कमी करणार आहेत. ते कधी होणार ही भीती पेट्रोल पंपचालक-मालकांमध्ये आहे. रविवारी (दि. 22) दरमध्ये झालेल्या कपातीमुळे पेट्रोलपंप चालक पाच लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच कंपन्यांमध्ये तांत्रिक अडचणी झाल्यामुळे पेट्रोल-डीझेल टॅंकरमध्ये भरता आलेले नाही. दुपारी एकनंतर ही समस्या सुटल्याने आज रात्रीपर्यंत पेट्रोल-डीझेलचा पुरवठा सुरळीत होणार आहे.“ – अनिल दारुवाला, राष्ट्रीय प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स, असोसिएशन