सासवड -सासवड नगर परिषदेमध्ये करोनाबाबत प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक असलेले किराणा दुकान, मेडिकल, दवाखाने, वैद्यकीय सेवा हे वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, सासवड नगर परिषद हद्दीत करोना रुग्ण नसल्यामुळे इतर सर्व दुकानांबाबत नगरपरिषदेने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी अटी व शर्तीच्या अधीन राहून सासवड शहरातील दुकाने बुधवार (दि. 17) पासून रोटेशन पद्धतीने उघडण्यास परवानगी दिली आहे.
दुकानदार व ग्राहकांनी तोंडावर मास्क बांधणे गरजेचे, दुकानात एका वेळी फक्त 5 ग्राहक खरेदीसाठी सोडण्यात यावे, दुकान प्रवेशद्वारावर ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंगची सुविधा करावी. दुकानात प्रवेशाच्या वेळी सर्व ग्राहकांना हॅंडवॉश किंवा सॅनिटायझर सुविधा करण्यात यावी. होम क्वारंटाइन असलेल्यांना दुकानांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये.
शक्यतो 5 वर्षे व 60 वर्षांवरील व्यक्तींचा प्रवेश टाळा, सर्व आस्थपना यांनी त्यांच्या दुकानात एक रजिस्टर ठेवायचे असून त्यामध्ये दुकानात येणाऱ्यांची संपूर्ण माहिती (नाव, पत्ता, वेळ व मोबाइल नंबर) नमूद करणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांचे दुकान तात्काळ बंद करून कारवाई केली जाणार आहे.