अभिषेकच्या चित्रपटाचे शूटिंग लखनऊ पोलिसांनी थांबवले

कोरोना संसर्गाची तीव्रता : लोकांकडून शूटिंगबद्दल तक्रारी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आजकाल आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये खूप व्यस्त आहे. अभिषेक बच्चन सध्या लखनऊमध्ये असून, तिथे त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. मात्र, दरम्यान, लखनऊ पोलिसांनी अभिषेक बच्चन याच्या या चित्रपटाचे शूटिंग थांबवल्याचे वृत्त समोर आले आहे. लखनऊमधील बेगम हजरत महल पार्कमध्ये हे शूटिंग सुरू आहे.

अभिषेक बच्चन यांच्या या टीमला चित्रपटाची शूटिंग करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु, असे असूनही पोलिसांनी याचे शूटिंग थांबवले. यासंदर्भात पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे की, कोरोना प्रोटोकॉल पाहता अभिषेक बच्चन यांच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

वास्तविक असे म्हटले जात आहे की, अभिषेक बच्चन आणि त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगचे वृत्त समजताच आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांनी या पार्कजवळ गर्दी करून जमायला सुरुवात केली. कोरोना व्हायरस संसर्गाची तीव्रता पाहून, काही लोकांकडून शूटिंगबद्दलच्या तक्रारी आल्या आहेत. तक्रार मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शूटिंग थांबवण्यास सांगितले.

मध्य विभागाचे डीसीपी सुमन कुमार म्हणाले की, खबरदारीचा उपाय म्हणून चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे, कारण शूटिंगदरम्यान सुमारे जवळपास 60 जण पार्कमध्ये उपस्थित होते. जेव्हा चित्रपटाच्या टीमला चित्रीकरणाची परवानगी देण्यात आली, तेव्हा त्यांना कोव्हिड-19 प्रोटोकॉलचे अनुसरण करण्यास सांगण्यात आले होते

कोरोना प्रतिबंध नियमांनुसार उद्याने, सार्वजनिक ठिकाणी बंद करण्यात आली होती. मात्र, शूटिंगसाठी दुपारच्या वेळेत हे पार्क उघडण्यात आले होते. यावेळी क्रू आणि जमाव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमले, त्यामुळे शूटिंग थांबवावी लागली. इतकेच नाही तर चित्रपटाच्या टीमने स्थानिक लोकांवरही गुंडगिरी केल्याचा आरोप केला होता. क्रू मेंबर्सचे म्हणणे आहे की, काही स्थानिक लोकांनी पोलिसांसमोर असभ्य कृत्य केले, त्यानंतर हाणामारीची परिस्थिती देखील निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी हा जमाव पांगवला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.