न्यूयॉर्क : जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणाऱ्या अमेरिकेत गोलोबाराचे सत्र काही केल्या संपत नाही. कारण अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेत व्हर्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
स्थानिक माध्यमांमधील अहवालानुसार, या गोळीबारात अनेक लोक जखमीही झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबाराची माहिती मिळताच चेसापीक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथून पळ काढणाऱ्या शूटरला बॅटलफिल्ड ब्लाव्ड येथे पकडण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी त्याच्यावर गोळीबारही केला.
चेसापीक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबाराच्या घटनेत सुमारे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या घटनेत बरेच लोक जखमी झाले आहेत. पोलीस या संपूर्ण घटनेची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ठार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत असून तपास सुरु आहे.
पोलिसांनी गोळीबार झालेल्या ठिकाणाहून लोकांची गर्दी हटवली आहे. तसेच, या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री 10 वाजून 12 मिनिटांनी गोळीबार झाल्याची माहिती देणारा फोन पोलिसांना आला होता.