शेवगाव – दारुच्या नशेत वडिलांनी लोखंडी गजाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सोमनाथ गोरख करपे (वय 18) या इयत्ता 12 वीतील मुलाचा नगर येथे उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील आखेगाव येथे आज पहाटे चारच्या सुमारास घडली.
या संदर्भात मयत मुलाची आई ताराबाई गोरख करपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसात गोरख किसन करपे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गोरख करपे हा फरार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत फिर्यादीत दिलेली माहिती अशी की, आखेगाव येथे गोरख करपे, पत्नी ताराबाई व मुले रवींद्र व सोमनाथ यांच्यासह राहण्यास आहेत. सोमनाथ हा शेवगावला इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. गोरख करपे नेहमी दारू पिवून घरी येवून घरच्यांना शिवीगाळ करीत असल्याने त्यांच्यात कायम किरकोळ वाद होत. सोमवारी (दि.29) सायंकाळी गोरख करपे दारू पिवून आला.
त्यावेळी त्यास त्यांच्या पत्नीने, तुम्ही सणाचा दिवस असताना का पिवून आले याचा जाब विचारला असता मुलगा सोमनाथ मध्ये आल्याने गोरख याने शिवीगाळ केली. त्यानंतर ताराबाई व मुलगा सोमनाथ आपल्या शेतातील उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता पहाटे 3.30 च्या सुमारास मुलगा सोमनाथ याचा ओरडल्याचा आवाज आल्याने आई ताराबाई त्याच्याकडे पळत गेल्या.
त्यावेळी गोरख करपे मुलाला हातातील लोखंडी गजाने डोक्यात मारीत होता. सोमनाथ हा शेतीच्या बांधावर गंभीर जखमी होऊन खाली पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. सोमनाथचा आवाज ऐकून शेजारील लोकही जमा झाले. त्यांनी त्यास शेवगाव येथे खासगी दवाखान्यात नेले.
मात्र, डॉक्टरांनी नगरला घेवून जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याला नगर येथील खासगी दवाखान्यात दाखल करून औषधोपचार सुरु असतांना तो मयत झाला. याबाबत पोलिसांनी गोरख करपे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हे अधिक तपास करीत आहेत.