चंदीगड – पंजाबमध्ये एका खासगी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींचे अत्यंत खासगी असे अंघोळ करतानाचे व्हिडिओ लीक झाल्यामुळे प्रचंड गदारोळ माजला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेले शेकडो विद्यार्थी शनिवारी रात्रीच रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. दरम्यान, या प्रकरणात एका विद्यार्थीनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लुधियाना चंदीगड महामार्गावरील एका खासगी विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. एका विद्यार्थीनीनेच आपल्या सोबत शिकणाऱ्या अन्य मुलींचे खासगी असे व्हिडिओ तयार करून ते जारी केले. या प्रकारामुळे काही विद्यार्थीनी हादरल्या असून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्याही प्रसृत झाल्या होत्या. काही विद्यार्थीने बेशुध्द अवस्थेत आढळल्याच्या बातम्यांवरून हा कयास वर्तवला गेला. मात्र या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ज्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे ती व्हिडिओ लीक न करण्यासाठी पैशांची मागणी करत होती असा आरोप तिच्यावर अन्य विद्यार्थीनींनी केला आहे. दरम्यान, आपण आपल्या एका मित्राला आपले फोटो पाठवले होते अशी कबुली संबंधित मुलीने एका माध्यमाशी बोलताना दिली आहे. मात्र तिने अन्य मुलींचे फोटो किंवा व्हिडिओ पाठवले होते का, याचा खुलासा झालेला नाही.
या घटनेचे पंजाबमध्ये जोरदार पडसाद उमटले असून पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंह बैंस यांनी विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या बहीणी आणि मुलींशी संबंधित हे अत्यंत संवेदनशील प्रकरण असून कोणा दोषीला सोडले जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या घटनेची उच्च स्तरीय चौकशी केली जाण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने प्रकरणाची दखल घेतली असून त्यासंदर्भात पंजाबच्या पोलीस महासंचालकांना निर्देश दिले आहेत.
विद्यापीठाचा खुलासा
आरोपी विद्यार्थीनीने तिचा खासगी व्हिडिओ तिच्या मित्राला शेअर केला आहे. अन्य मुलींचा नाही असा खुलासा संबंधित विद्यापीठाने केला आहे. गदारोळ सुरू झाल्यानंतर प्रभारी कुलगुरू आर. एस. बावा यांनी ही माहिती दिली आहे.
60 मुलींचे व्हिडिओ लीक
अगोदर सांगण्यात आलेल्या बातम्यांनुसार संबंधित आरोपी मुलीने 60 मुलींचे खासगी व्हिडिओ लीक केल्याचे म्हटले होते. या प्रकारामुळे हादरलेल्या 8 मुलींना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही म्हटले जात होते. यातील एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली गेली आहे. मात्र पोलिसांनी हे म्हणणे खोडून काढले असून त्यात काही तथ्य नसल्याचे जाहीर केले आहे.