मुंबई – झारखंडमधील एका जहाल नक्षलवाद्याला जेरबंद करत महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली आहे. या जहाल नक्षलवाद्यांवर 15 लाख रुपयांचे बक्षिस होते. नालासोपाऱ्यातून त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती एटीएए अधिका-याने दिली.
हुलाश यादव असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तो नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. तसेच माओवादी संघटनेचा सदस्य आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले आहे. झारखंड सरकारने त्याच्यावर 15 लाखांचे बक्षीस ठेवले होते.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, हुलाश यादव हा रविवारी पहाटे नालासोपारा येथील रामनगर येथील धानवीतील एका चाळीत औषधोपचाराकरीता येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचत यादवला ताब्यात घेतले. या आरोपीबाबत झारखंड पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु असल्याचे एटीएसने सांगितले.
दरम्यान, हुलाश यादव हा मुळचा झारखंडच्या डोडगा येथील रहिवासी आहे. तो सन 2004 पासून नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. तसेच तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकारने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटी सदस्यदेखील आहे.