धलाई – दारू पिल्याचे वाईट परिणाम आपण नेहमीच ऐकत आलो आहे. अनेकदा दारू पिल्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. मात्र दारू समजून अॅसिड पिल्याची धक्कादायक घटना धलाई गावात घडली आहे. या गावातील 3 जणांचा मृत्यू अॅसिड पिल्यामुळे झाला आहे.
येथील स्थानिक पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,सोमवारी एका पार्टीदरम्यान तिघांनी चुकून अॅसिड पिले. अॅसिड पिण्याआधी तिघेही आधीच दारुच्या नशेत होते. पार्टीत तीन मृतांसह 10 लोक सहभागी झाले होते. पार्टीत जास्त दारू प्यायल्यानंतर तिघांनी चुकून अॅसिड प्यायले. या पार्टीतील कृष्णा जय पारा येथील सचिंद्र रेआंग (22),हजरधन पारा येथील अधीराम रेआंग (40) आणि नेपाळटीला भागातील भाबीराम रेआंग अशी मृतांची नावे आहेत.
ते दारुच्या नशेत असल्याने दारू आणि अॅसिडमधील फरक समजू शकले नाही. घटनेनंतर लगेचच तिघांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तेथून बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात रेफर केले. पण, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.