ठाणे – ठाणे महापालिकेच्या माजीवडा प्रभागाच्या सहायक आयुक्तांवर सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर अतीक्रमण हटाव मोहीम सुरू असताना एका फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांच्या हाताची तीन बोटे तुटली असून त्यांना ज्युपीटर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्यांचा अंगरक्षकही जखमी झाला आहे.
दरम्यान या कारवाईचा राजपत्रित अधिकारी आणि पालिका कर्मचारी संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे.
कल्पिता पिंगळे या आज कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या,त्यावेळी एका फेरीवाल्याने त्यांच्यावर धारधार कोयत्याने त्याच्यावर हल्ला करत त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. त्यात त्यांची तीन बोटे तुटली असून डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे.
पिंगळे यांच्यावर सुरूवातीला ठाण्यामधील वेदांता रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांना पुढील उपचारांसाठी ज्युपिटर रूग्णालयात हलवण्यात आले.कासारवडवली जंक्शनच्या येथे आज कल्पिता पिंगळे या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या. या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर अनधिकृत व परप्रांतीय फेरीवाले असतात. यावेळी त्यांच्यासोबत असलेला अंगरक्षक देखील त्यांच्या मदतीला धावून आला होता, त्यामळे तो देखील जखमी झाला आहे. त्याच्यावर देखील उपचार सुरू आहे.