नवी दिल्ली – भारताचा माजी सलामीवीर फलंदाज शिवसुंदर दास याची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (एनसीए) अनुभवाचा फायदा महिला क्रिकेटपटूंना करून देण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे.
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली शिवसुंदर दासने एनसीएमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. एनसीएमध्ये मी गेल्या 4-5 वर्षांपासून कार्यरत असून, द्रविडकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा खूप आभारी आहे, अशा भावनाही त्याने व्यक्त केल्या.
रमन यांना अझहरचा पाठिंबा
भारताचे माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन यांनी अलीकडेच महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या डब्ल्यू. व्ही. रमन यांना पाठिंबा दिला आहे. रमन यांच्यापेक्षाही क्रिकेटमध्ये अनेक सुपीक डोकी आहेत.
रमन यांचे क्रिकेटमधील ज्ञान आणि प्रशिक्षण कौशल्याचा अनेक जणांना लाभ झाला आहे. त्यांच्यापेक्षा अनेक हुशार डोकी आहेत, पण रमन यांच्याकडे क्रिकेट प्रशिक्षणाचा अफाट अनुभव आहे. त्यांना कायम कार्यरत ठेवण्यासाठी हैदराबाद क्रिकेट संघटना प्रयत्न करणार आहे, असे अझरुद्दीन यांनी म्हटले आहे.