कोथरूडमध्ये मी परका नाही
कोल्हापूर: पुण्यात शिवसेनेने एकाही जागेसाठी हट्ट धरला नव्हता, असे सांगतानाच मला जेवढे कोथरूड माहित आहे, तेवढे अन्य कोणालाही माहीत नाही. त्यामुळे मी तेथे परका नाहीच, असा दावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पीाल यांनी मंगळवारी येथे केला.
युतीतील जागावाटप शुक्रवारी अंतिम रुप घेईल. त्यावेळीच कोणाला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होईल, असेही श्री. पाटील म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. पुण्याशी माझे नाते 1982पासून आहे. त्यामुळे पुणेकर मला परकं मानत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
युतीमध्ये जागा वाटप करताना फॉर्म्युला ठरला आहे. सात ते आठ जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाही. नागपूर आणि पुणे जिल्ह्यात सर्व जागा भाजपला मिळाल्या आहेत. पण शिवसेनेनेही त्यासाठी आग्रह धरला नाही. जागा वाटपात न्याय अन्याय होत राहतो. शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आहे. दोन्ही पक्षांना जागा किती हे आता सांगता येणार नाही. चार ऑक्टोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, हे स्पष्ट होईल, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले. सात तारखेला राज्यातील सगळे बंडोबा थंड होतील. युतीचा फॉर्म्युला लोकांना कळण्याची गरज नाही. युती झाली हे पुरेसे आहे, असे ते म्हणाले.