नारायणगाव-जुन्नर विधानसभेचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल बेनके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येणार उपस्थित राहणार आहेत. ही बाब जुन्नर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असल्याची माहिती तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली.
गेल्या महिन्याभरात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा पक्षबांधणीसाठी झंझावात सुरू आहे. मागील आठवड्यात ईडीच्या माध्यमातून शिखर बॅंक घोटाळ्याच्या गुन्ह्यांमध्ये पवार यांचे नाव आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर जुन्नरला शरद पवार काय भूमिका मांडणार? याकडे संपूर्ण राज्यासह तालुक्याचे लक्ष लागले आहे. जुन्नर तालुक्याच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये प्रथमतःच एखाद्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष येत आहेत. अतुल बेनके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, कॉंग्रेसचे सत्यशिल शेरकर, सभापती संजय काळे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व मित्र पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.