मुळशी तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का
पिरंगुट – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक तसेच मुळशी तालुक्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महत्त्वाचे नेते आत्माराम कलाटे यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
आत्माराम कलाटे हे मुळशीतील राष्ट्रवादी पक्षाचे आघाडीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. गेली सहा महिन्यांपासून ते राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याच्या चर्चा होत्या. कलाटे यांनी एकदाचे शिवबंधन बांधून हातात भगवा घेतल्याने राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिल्याचे निश्चित झाले. कलाटे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमाने गेली अनेक वर्षे जिल्ह्यात व तालुक्यात सहकार क्षेत्रात काम केले.
यापूर्वी त्यांनी पुणे जि. प. सदस्य म्हणून पाच वर्षे काम केले व त्यांच्या पत्नी आशालता कलाटे यांनी मुळशी पं. स. सभापती म्हणून काम केले. कलाटे यांच्या शिवसेना प्रवेशाने मुळशीच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्यांच्या जाण्याने मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसला सहकारात मोठे खिंडार पडले. यावेळी मुळशी तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष बबन साखरे व काळूराम आखाडे व बंडू आमले यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला.
विधानसभेसाठी आणखी एक दावेदार
कलाटे यांच्या शिवसेना पक्षातील प्रवेशाने विधानसभा सभेसाठी मुळशीतून आणखी एका प्रबळ दावेदाराची भर पडली. मुळशीतून यापूर्वी दत्ता टेमघरे, बाळासाहेब चांदेरे हे विद्यमान शिवसैनिक उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यात आत्माराम कलाटे यांच्या नावाचा समावेश झाला. असे असले तरी पक्षश्रेष्ठींनी कलाटे यांना कोणत्या अटींवर प्रवेश दिला, हे महत्वाचे आहे. तसेच सेना भाजपाच्या युतीचे काय होणार? भोर, वेल्ह्यातील इछुकांचा कसे थांबविणार यानुसारही उमेदवारीची बरीच समीकरणे बदलणार आहेत हे नक्की.