आमदार सचिन अहिर यांचा बारामती, इंदापूर, दौंड दौरा जळोची – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून “होऊ दे चर्चा’ ही नवी संकल्पना पक्षाच्या माध्यमातून राबविली जाणार आहे.अन त्याची सुरुवात बारामतीतून करण्यात आली आहे. अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने मागील नऊ वर्षांत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता त्यांच्याकडून सुरू असणारे राजकारण याबाबतचा लेखाजोखा “होऊ दे चर्चा’ या माध्यमातून नागरिकांसमोर मांडणार आहोत. शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीबाबत बोलताना अहिर म्हणाले की, 25 वर्षे आम्ही भाजपसोबत होतो. पण त्यांच्याकडून पाहिजे तसा न्याय मिळाला नाही. अडीच वर्षे आमचे सरकार असताना ओरड करणारेच आता राष्ट्रवादीसोबत आहेत. आता आम्ही येणाऱ्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. विरोधकांची रिकामी झालेली जागा भरुन काढण्यावर आमचा भर असेल. जनतेच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावरही उतरणार असल्याचेही यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले की, जालन्यातील घटनेनंतर शरद पवार यांच्यापाठोपाठ आमचेही नेते तिथे गेले. राज्य सरकारला जाग आणण्याचे काम आम्ही केले. यापूर्वी विरोधी पक्षात असलेले नेते मराठा आणि धनगर आरक्षण दोन महिन्यांत देऊ म्हणायचे. पण सत्तेत आल्यावर ते आरक्षणाचा विषय केंद्राकडे असल्याचे सांगू लागले आहेत. आम्ही या प्रश्नावर राज्यपालांचीही भेट घेतली.आता संसदेचे विशेष अधिवेशन होत आहे.त्यामध्ये हा विषय घ्यावा, त्याला आमचा पाठिंबा असेल. त्यातून भाजपचीही भूमिका समजेल. त्यांनी ठराव आणावा आणि हा विषय मार्गी लावावा, असेही त्यांनी सांगितले. फुटून गेलेले आमदार संपर्कात अहिर म्हणाले, जे आमदार शिवसेनेतून फुटून गेले. तेच लोक मला आता संपर्क करायला लागलेले आहेत. खरा विचार तर तुमच्याकडे आहे. आम्ही तर आचार घालत होतो. हे त्यांच्या लक्षात आले. काही लोक राष्ट्रवादीवर टीका करीत होते. मात्र, राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर त्यांच्या गळ्यात हार घालायला हीच लोक पुढे होती, असे म्हणत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना नाव न घेता टोला लगावला.