फलटण – फलटण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटणीचा आहे, कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढविणार आहे. उमेदवार कोण हे न पाहता “धनुष्यबाण’ हाच उमेदवार आहे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
येथील नवलबाई मंगल कार्यालयात फलटण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात श्री. रावते बोलत होते. यावेळी माजी आमदार बाबूराव माने, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव हणमंत चवरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप झनझने, विकास नाळे, स्वप्नील मुळीक आदी उपस्थित होते. युती शासनाने अनेक लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. या निर्णयाचा जनतेला फायदा होणार आहे. काही जण कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष असल्यापासून वर्चस्व ठेवून असले तरी आपले वर्चस्व आता वाढवले पाहिजे, आपला नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार झाला पाहिजे, याची गंभीर दखल प्रत्येक शिवसैनिकाने घ्यावी. जागावाटपाची चिंता करू नका, असे रावते यांनी सुनावले.
फलटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अपेक्षेप्रमाणे मागील काही वर्षापासून वाढलेली नसली तरी लोकांच्या मनात हा पक्ष आहे. अशा कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे असे आवाहन करीत रावते यांनी “बाबूराव माने यांनी नेहमी पक्षाचा आदेश मानला आहे,’ असे सांगत अप्रत्यक्षपणे त्यांनी माने यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. या मेळाव्यास कार्यकर्त्यांच्या कमी उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करताना पदाधिकाऱ्यांनाही रावते यांनी फटकारले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे शिवबंधन बांधून रावते यांनी स्वागत केले.