दिवसभर परिसरात चर्चांना जोर
पुणे – युती होणार, की नाही हे गुलदस्त्यात असले तरी पुण्यात मात्र युतीच्या जागावाटपात हडपसर विधानसभा मतदारसंघ “हॉट सीट’ ठरू लागला आहे. पुण्यात अस्तित्त्व कायम ठेवण्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेला दिल्याची राजकीय चर्चा मंगळवारी जोरदार रंगली होती. मात्र, दोन्ही पक्षांनी याबाबत अधिकृत खुलासा केला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांची धावपळ झाली.
गेल्या वेळी येथून भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे महादेव बाबर यांचा पराभव केला. तर, 2009मध्ये या मतदारसंघात बाबर यांनी विजय मिळविला होता. त्यामुळे 2019 च्या युतीच्या जागा वाटपाचा पहिला फॉर्म्युला ठरताना, विद्यमान जागा ज्या पक्षाकडे असतील, तेथे त्याच पक्षाचे उमेदवार असतील, असे सूत्र ठरवले होते. त्यामुळे गेल्या महिनाभरात हडपसरची चर्चा नव्हती. मात्र, शिवसेनेकडून माजी आमदार महादेव बाबर, तसेच नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी ही जागा मिळावी अशी मागणी केली आहे. लोकसभेला या मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव यांना 5 हजारांचे मताधिक्य आहे. त्यामुळे शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यातच इंदापूरमध्ये कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे. मात्र, ही जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेकडे या जागेची मागणी केली आहे. त्याबदल्यात शिवसेनेला पुणे शहरात एक जागा हवी आहे. ही जागा हडपसर असावी, अशी आग्रहाची मागणी होत असतानाच शिवसेनेला हडपसर सोडल्याची राज्यातील नेत्यांमध्ये होत आहे. त्यामुळे हडपसरची जागा पुन्हा चर्चेत आली आहे. तर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी ही चर्चा फेटाळून लावली असून याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे म्हटले आहे.