भोर – भोर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीजवळ रस्त्याच्या बाजूला वर्षांनुवर्षे मासळी विक्री करणाऱ्या भोई, कातकरी समाजातील व्यवसायीकांना तेथून हटविण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. त्यामुळे पालिकेने मासळी विक्री करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी व मासळी मार्केटची निर्मिती करावी, या मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 29) शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
युवा सेनेचे तालुकाप्रमुख, माजी नगरसेवक केदार देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शहरप्रमुख नितीन सोनावले, किरण पवार, युवराज जेधे, स्वप्निल शिनगारे, राजेश शिंदे यांच्यासह शिवसैनिक, भोई व कातकरी समाजातील मासे विक्री करणारे व्यवसायीक सहभागी झाले होते. नगरपालिकेने मासळी विक्रीचा व्यसाय करणाऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक न केल्यास शिवसेना नगरपालिकेच्या प्रवेश द्वारासमोरच मासळी विक्री करेल, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.