नाशिक – नाशिक शहरात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून येवला हा हॉटस्पॉट बनला आहे. त्यातच नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांसह इतर अधिकाऱ्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य आमदार नरेंद्र दराडे हे येवला शहरात राहतात. काही दिवसांपूर्वी ते नातेवाईकांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्या नातेवाईकाला करोनाची लागण झाल्याचे त्यांना समजले. यानंतर दराडे यांनी तातडीने करोना तपासणी केली. त्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दराडे यांनी उपचारासाठी मुंबईत धाव घेतली. त्यांच्यावर पुढील तपासणीनंतर लीलावती किंवा फोर्टिस रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
नरेंद्र दराडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दराडे हे कार्यकर्त्यांसह अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी घेत होते. यामुळे येवला शहरातील शिवसैनिकांमध्येही चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.