अग्रलेख: श्रावणमासी… पण हर्ष नाही मानसी

भारतासह जगाला ग्रासून टाकलेल्या करोना विषाणूच्या महासंकटाला आता चार-पाच महिने होत आले आहेत. देशात 22 मार्चला पहिल्यांदा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आणि त्यानंतर लगेचच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या गेल्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाले असले तरी लोकांनी त्याची सवय लावून घेतली होती. पण आता भारतासारख्या संस्कृतीप्रिय आणि उत्सवप्रिय देशामध्ये सणासुदीच्या कालावधीमध्ये करोनाचा प्रभाव कितपत राहतो, हेही पाहावे लागणार आहे.
सर्व मराठी महिन्यांचा राजा मानण्यात आलेल्या श्रावण महिन्याला उद्या मंगळवारपासून सुरुवात होत आहे. श्रावण महिना म्हणजे सणांचा आणि उत्सवाचा महिना. एकतर श्रावण येण्यापूर्वी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने सर्वत्र हिरवाई पसरलेली असते. त्यामुळे सर्वत्र एक वेगळेच उत्साहाचे वातावरण असते. त्यातूनच “श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे’ ही कविता कवीला सुचली होती.
एकीकडे निसर्गाची मुक्त उधळण आणि दुसरीकडे सणांचा बोलबाला यामुळे श्रावण हा सर्वांच्याच आवडीचा महिना मानण्यात येतो; पण दुर्दैवाने या वेळी श्रावणावरही महासंकटाचा प्रादुर्भाव असल्याने श्रावण मास सुरू झाला असला तरी सर्वसामान्यांच्या मनात हर्ष आहे, असे मात्र म्हणता येत नाही. तसे पाहायला गेले तर गेल्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये रामनवमी असो किंवा इतर धर्मियांचे काही सण असो, सर्व लोकांनी सहकार्य करून हे सण आणि उत्सव साजरे केले नव्हते.
अर्थात, हे उत्सव ज्या कालावधीमध्ये होते त्या काळात देशात आणि राज्यांमध्ये लॉकडाऊन अतिशय कडक आणि तीव्र होता. पण आता अधूनमधून लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असल्याने आणि लोकही पूर्वीसारखे गांभीर्याने घेत नसल्याने रस्त्यावरील गर्दी वाढत आहे. श्रावण महिन्यात दररोज काही ना काही तरी सांस्कृतिक परंपरेचे पालन केले जाते.
मंगळागौर, नागपंचमी आणि राखीपौर्णिमा असो किंवा श्रावणी सोमवारचे धार्मिक महत्त्व असो या कालावधीमध्ये लोक उत्साहाने घराबाहेर पडत असतात. पण उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये असेच चित्र दिसेल असे वाटत नाही. कारण लोकांना एकत्र येण्यास अद्यापही बंदी असल्याने श्रावण महिन्यातील कोणतीही सांस्कृतिक किंवा धार्मिक परंपरा पाळण्यात अनेक अडचणी येणार आहेत.
श्रावणातील सर्व सण उत्सव आणि परंपरा या गर्दीसाठीच असतात. साहजिकच या सर्व सण आणि उत्सवांना सर्वसामान्य नागरिक यावेळी मुकणार आहेत. अर्थात, केवळ श्रावण महिन्यापुरती ही बाब मर्यादित नाही. कारण श्रावण महिन्यापासून देशात सण आणि उत्सवांची परंपरा आणि उत्साह सुरू होतो. श्रावण संपल्या संपल्या भाद्रपद महिन्यात लगेच गणपतीचे वेध लागतात.
गणेशोत्सवानंतर नवरात्र आणि दिवाळी या सणांची नागरिक वाट पाहत असतात. या सर्वच सण आणि उत्सवांमध्ये गर्दी हा महत्त्वाचा घटक असल्याने कोणताही सण यावर्षी त्याच उत्साहाने साजरा होण्याची कोणतीही शक्यता नाही. गणेशोत्सवाबाबत सरकारने आधीच निर्णय घेतला आहे. करोना महामारी नियंत्रणात आली नाही तर तसाच निर्णय नवरात्र आणि दिवाळी बाबतही घ्यावा लागेल, असे संकेत मिळत आहेत.
एकूणच अर्थव्यवस्थेला ज्याप्रमाणे महासंकटाचा फटका बसला आहे तसाच फटका देशाच्या सांस्कृतिक व्यवस्थेलाही बसला आहे. सरकारच्या आदेशाचे पालन करून सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या उत्सवप्रियतेला लगाम घातला असला तरी त्यामुळे सणांशी संबंधित अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्याचा विचार करण्याची हीच वेळ आहे.
अनेक छोटे छोटे घटक या सण आणि उत्सवाशी जोडले गेलेले असतात. या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करून वर्षभराची बेगमी करणारे हे छोटे व्यावसायिक असतात. मंदिराबाहेर फुले किंवा नारळ विकणाऱ्यांपासून मोठं मोठे धार्मिक समारंभ आयोजित करणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच यावर्षी जोरदार फटका बसला आहे.
गेल्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये समाजातील अनेक घटकांचा विचार करून त्यांना योग्य भरपाई देण्याबाबत हालचाली सुरू असल्या तरी दररोज आर्थिक व्यवहार करून आपले पोट भरणाऱ्या अशा शेकडो छोट्या-छोट्या घटकांकडे कोणीही लक्ष देत नाही, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. साहजिकच सरकारला आता या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागणार आहे.
सण-उत्सव यांच्या माध्यमातूनच भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळते. देशातील अनेक देवस्थानांची कोट्यवधीची उलाढाल पाहता ही बाब लगेच स्पष्ट होते. अर्थात, या मोठ्या देवस्थानांनाही फटका बसला आहेच शिवाय या देवस्थानांवर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही जोरदार फटका बसला आहे.
श्रावणापासून सुरू होणाऱ्या चार महिन्यांमध्येच या ठिकाणची अर्थव्यवस्था जोर धरत असते. यावर्षी तसे होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीये. अर्थव्यवस्थेतील आणि समाजव्यवस्थेतील इतर सर्व घटक सुरू करण्याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जसा पुढाकार घेतला आहे तसाच पुढाकार थोड्या प्रमाणात का होईना, पण ही धार्मिक अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावाच लागेल.
देशातील आणि राज्यातील सध्याचे चित्र पाहता लोकांनी आता करोना विषाणूसोबत जगण्याची मानसिकता तयार केली आहे. गर्दी करण्याची एकमेव चुकीची गोष्ट सोडता बहुतेक सर्व स्वच्छता विषयक नियमांचे पालन केले जात आहे. जगात इतरत्र बहुतेक सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले आहेत. क्रीडाक्षेत्रातील क्रिकेटमधील कसोटी सामनेही सुरू झाले आहेत. सर्व मूलभूत नियमांचे पालन करण्याची हमी घेऊन या सर्व घटकांना व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हाच दृष्टिकोन देशातील सण-उत्सव आणि धार्मिक परंपरा यांच्याबाबत सरकारने बाळगला आणि काही नियंत्रित प्रमाणात परवानगी दिली तर लोकांच्या मनातील मरगळ निघून जाईल. आगामी चार महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक सण आणि उत्सव असल्याने अर्थव्यवस्थेला त्याचा हातभारच लागणार आहे. हा सर्व विचार करूनच लोकांच्या मनातील श्रावण हर्षभरित करण्यासाठी सरकारला पावले टाकावी लागतील.





