लक्षवेधी: राजस्थानातील ऑडियो टेपकांड

हेमंत देसाई
राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचे प्रयत्न तूर्तास अयशस्वी ठरले असले, तरी पुढील आठवड्यात न्यायालय तसेच विधानसभाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या कार्यकक्षेत कोणते निर्णय होतात ते पाहणे, हाच कुतूहलाचा विषय असेल.
सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली 19 बंडखोर आमदारांनी राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याची सुनावणी सुरू आहे. येत्या मंगळवारपर्यंत त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची कोणतीही कारवाई न करण्याचे आश्वासन विधानसभाध्यक्षांनी न्यायालयास दिले आहे.
राजस्थानमधील या बंडखोरीचा निकाल काय लागतो, यावर देशाचे पुढील राजकारण कोणत्या मार्गाने जाईल हे अवलंबून असेल. या बंडखोर आमदारांच्या कृतींबाबत स्पष्टीकरण मागवणारी नोटीस विधानसभाध्यक्षांनी त्यांना दिली आहे. कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी दुष्टहेतूने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ही नोटीस पाठविली असून, धाडलेल्या नोटिशीस उत्तर देण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ द्यायला हवा, असा बंडखोरांचा युक्तिवाद आहे.
हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू लढवली होती. तर मुकुल रोहतगी यांनी मोदी सरकारमध्ये ऍटर्नी जनरलचे पद भूषवले होते. हे दोघेही या बंडखोरांच्या बाजूने न्यायालयात किल्ला लढवत आहेत. आमदारांना नोटीस पाठवणे ही गोष्ट विधानसभेच्या कक्षेत येते आणि त्यात न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असा युक्तिवाद विधानसभाध्यक्षांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. घटनेच्या परिशिष्ट दहानुसार, विधानसभाध्यक्षांना नोटीस पाठवण्याचा अधिकार आहेच. तसेच नोटिशीला उत्तर देण्यापूर्वीच पायलट गटाच्या सदस्यांनी न्यायालयात जाणे, हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल.
या सगळ्यापेक्षा धक्कादायक गोष्ट शुक्रवारी घडली. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, कॉंग्रेसचे आमदार भंवरलाल शर्मा आणि जयपूरस्थित व्यापारी संजय जैन हे तिघे गेहलोत सरकार पाडण्यासाठी कॉंग्रेसच्या आमदारांना लाच देण्यासंदर्भात एकमेकांशी बोलत असल्याची ऑडियो टेप बाहेर आली आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणजीत सूरजेवाला यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन, या ऑडियो टेपमधील संभाषणाची माहिती दिली. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, जैन यांना अटकही करण्यात आली आहे.
जैन हे भाजपचे नेते असल्याचा उल्लेख काहीजणांनी केला, तेव्हा त्यांचा भाजपशी संबंध नाही, असा खुलासा तत्परतेने करण्यात आला. परंतु भाजपच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्याबरोबरचे जैन यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ऑडियो टेपमधील आवाज माझा नाही, असा खुलासा शेखावत यांनी केला आहे. परंतु शेखावत यांना मी बरीच वर्षे ओळखतो आणि तो आवाज त्यांचाच आहे, असा दावा कॉंग्रेसचे नेते महेश जोशी यांनी केला आहे.
कॉंग्रेसने बंडखोर आमदार विश्वेंदर सिंह आणि या टेपमध्ये ज्यांचा आवाज आहे, ते भंवरलाल शर्मा यांना निलंबित केले आहे. तर शर्मांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला असून, ते उपद्व्यापी गृहस्थ असल्याचे सांगण्यात येते.
2015 साली तेलंगण विधान परिषदेच्या निवडणुका होत्या. तेव्हा एका नामनिर्देशित आमदारास तेलुगू देसम पक्षाचे नेते लाच देत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. या प्रकरणी तेलुगू देसम पक्षाचे आमदार रेवंथ रेड्डी यांना अटक झाली होती. त्यावेळी जाहीर झालेल्या एका फोन संभाषणात आंध्रचे तत्कालीन मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचा आवाज असल्याचे सांगण्यात आले.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या आदेशावरून तेलंगण सरकारने राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली, असा आरोप तेलुगू देसमने तेव्हा केला होता. वायएसआर कॉंग्रेस पक्षाची यास फूस होती, असेही चंद्राबाबूंनी म्हटले होते. यथावकाश न्यायालयाने रेवंथ यांना जामीन दिला. याबाबत पुरेसा पुरावा मिळाला नसल्याचा शेरा न्यायालयाने मारला होता.
भारत-अमेरिका अणुकरारावरून 2008 साली डाव्यांनी यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर सरकारने विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतला. परंतु त्यावेळी तीन भाजप सदस्यांनी लोकसभेत नोटांची बंडले भिरकावली. आमचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि आम्ही ठरावाच्या वेळी सभागृहात गैरहजर राहण्याकरिता हे पैसे सरकारतर्फे देण्यात आले, असा आरोप भाजपने तेव्हा केला.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याचीही मागणी तेव्हा करण्यात आली. त्यानंतर पंधरवड्याने अशोक अरगल, फग्गनसिंग कुलस्ते आणि महावीर भगोरा या आपल्या खासदारांना लाच देऊ करण्यात आली, याबाबतचा दस्तावेजी पुरावा भाजपकडून सादर करण्यात आला. व्हिडिओ रेकॉर्डिंगची लेखी संभाषणे आणि दोन खासदारांची स्पष्टीकरणात्मक पत्रे, हा तो पुरावा होता. यामध्ये नेमके काय घडले, याची चौकशी करण्यासाठी संसदेने किशोरचंद्र देव समिती नेमली.
समाजवादी पार्टीचे राज्यसभा सदस्य अमरसिंग आणि कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांच्यावरही भाजपने आरोप केले होते. लाच देण्यामागे हे दोन नेते होते, असा दावा करण्यात आला होता. पण या दोन नेत्यांविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही, असा निष्कर्ष देव समितीने काढला.
मात्र अमरसिंग यांचे सहकारी संजीव सक्सेना, भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते सोहेल हिंदुस्तानी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे सहायक सुधींद्र कुलकर्णी यांची या प्रकरणात अधिक चौकशी करावी, असे समितीने म्हटले होते. पुढे या प्रकरणात पोलीस तपास झाला. न्यायालयाने तर अमरसिंग, सुधींद्र कुलकर्णी आणि संबंधित भाजपच्या खासदारांना “कॅश फॉर व्होट्स’मध्ये क्लीनचिट दिली.
संसदेत घोडेबाजार कसा चालतो, हे दाखवण्यासाठी ते नोटा घेऊन गेले होते, असे न्यायालयाने सांगितले. मात्र निर्दोष सुटका होण्यापूर्वी अमरसिंग, सुधींद्र कुलकर्णी यांच्यासह संबंधित खासदारांना काही दिवस तुरुंगात काढावे लागले होते. या प्रकरणाचे सूत्रधार आणि राजकारणातले दलाल यांच्यावर पुरेशा पुराव्याअभावी कोणतीही कारवाई होऊ शकली नाही.
2008ची ही लाचबाजी जेवढी गंभीर, तेवढीच राजस्थानातील कथित लाचबाजी घृणास्पद आहे. संसदेच्या उच्च परंपरांचा अपमान झाला, असे तेव्हा भाजपला वाटत होते. आज मात्र ते कोणत्या विधिमंडळ परंपरांचा सन्मान करत आहेत, हे जगासमोर आले आहे. मग तपासात काहीही सिद्ध होवो अथवा न होवो!





