उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांची पत्रकार परिषदेत मागणी
सातारा – प्रतापगडावर येत्या 3 डिसेंबर रोजी शिवप्रतापदिन भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिवप्रतापदिन उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केली.
छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये एकबोटे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. समितीचे अधिवक्ता गोविंद गांधी, ऍड. दत्तात्रय सणस, उमेश गांधी उपस्थित होते. एकबोटे म्हणाले, शिवप्रतापदिन हा प्रचंड
ऊर्जेने भारलेला ऐतिहासिक दिवस आहे. छत्रपती शिवरायांनी 1659 साली प्रतापगडावर केलेली लढाई जगातील सर्वोत्तम दहा युद्धांपैकी एक मानली जाते.
या दिवसाचे स्मरण तितक्याच व्यापक व भव्य पद्धतीने झाले पाहिजे. प्रतापगडावरील शिवपुतळ्यावर पुष्पवृष्टी व पालकमंत्र्यांची उपस्थिती या गोष्टी अनिवार्य व्हायला हव्यात. मात्र, जिल्हा प्रशासन पुढाकार केवळ औपचारिकता म्हणून हा कार्यक्रम उरकते. शिवप्रभूंच्या या पराक्रमाला शासकीय मानवंदना देण्यात यावी. यापुढे जे मान्यवर व निमंत्रित उत्सवाला हजेरी लावणार नाहीत, त्यांची नावे काळ्या यादीत टाकून जाहीर करण्यात येतील.
शिवप्रतापदिन वर्षानुवर्षे साजरा करणाऱ्या संस्थांना विश्वासात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून या उत्सवाचे नियोजन करण्यात यावे. महाराष्ट्राच्या क्षात्रवृत्तीचे प्रदर्शन करणाऱ्या ऐतिहासिक खेळांचे आयोजन, प्रसिद्ध वक्ते, लष्करी अधिकाऱ्यांची व्याख्याने या माध्यमातून आजच्या पिढीवर शिवसंस्कार होण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी एकबोटे यांनी केली. या उत्सवासाठी छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.