महाबळेश्वर – खासगी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे मंगळवारी अंबेनळी घाटात अवघड वळणावर एसटी बस व खासगी बस यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. एसटी चालकाने प्रसंगावधान राखून आपली बस कड्याच्या बाजूला उभी केली, परंतु धोकादायक वळणावर खाजगी बस चालक भरधाव वेगात असल्याने त्याचा बस वरील ताबा सुटला व खाजगी बस उभ्या एसटी बसवर समोरा समोर आदळली.
अहमदनगर येथील देसरडा भंडारे प्रोफेशल ऍकॅडमी प्रा. लि. या संस्थेचे 120 विद्यार्थी आणि संस्थेचे शिक्षक पदाधिकारी हे महाबळेश्वर सहलीवर आले होते. मंगळवारी सकाळी ते प्रतापगड किल्ल्यावर गेले होते. तेथून पुन्हा अंबेनळी घाटातून महाबळेश्वरला येत होते. याच दरम्यान महाबळेश्वर आगाराची महाबळेश्वर महाड ही बस निघाली होती.
घाटातील एका अवघड वळणावर सहलीच्या बसेस समोर येताना दिल्याने एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटी कड्याच्या बाजूला उभी केली. मात्र, खासगी बेभान होऊन बस चालवणाऱ्या चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि खासगी बसने एसटीला समोरासमोर धडक दिली. या धडकेत खासगी बसच्या समोरील बाजुचे मोठे नुकसान झाले असून आठजण जखमी झाले आहेत.