वाघोली : गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी वाघोली येथील महिलेवर गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली होती. मात्र अटकेची कारवाई केल्यानंतर महिला पोलिस कामात व्यस्त असताना नजर चुकवून आरोपी महिलेने धूम ठोकली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील गायरान वस्ती येथे होत असलेल्या गांजा विक्रीबाबत माहिती मिळाल्यानंतर २५ एप्रिल रोजी रात्री उशिरा लोणीकंद पोलिसांनी छापा टाकून १ किलो ३२९ ग्रॅम गांजा जप्त करून छकुली राहुल सुकळे (वय २४, रा. वाघोली) या महिलेवर गुन्हा दाखल केला होता.
रात्रीची वेळ असल्याने महिलेला अटक न करता तिला नोटीस देण्यात आली. २६ एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास महिलेस अटकेबाबत नोंद घेण्यात आली. त्यानंतर महिला पोलीस तळेकर यांच्याकडे ताब्यात देण्यात आली. दुपारी १२ च्या सुमारास तळेकर सीसीटीएनएस कक्षामध्ये काम करीत असताना छकुली सुकळे नजर चुकवून पळून गेली.
पोलिस नाईक जगताप व तळेकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात व परिसरात शोध घेतला असता ती सापडली नाही. यानंतर ३० एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, छकुली सुकळे हिच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात भादवि कलम २२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.