शिरूर (प्रतिनिधी): शिरूर शहरात महसूल खात्याच्या वतीने परप्रांतीय मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर राज्यामधील नागरिकांना पाठवण्यासाठी एसटी बसची व्यवस्था केली. परंतु याठिकाणी आता पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडे ,चाकण, दौंड या संवेदनशील (कोरोना रोगाचे हॉट स्पॉट) भागातून परप्रांतीय लोंढे शिरूरला दाखल होत असताना शिरूरची चिंता, भीती वाढली असून महसूल खाते ही चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
आज दुपारपर्यंत पावणेचार हजार पर्यंत नागरिकांना १६४ एसटी बसमधून तर १०९३ परप्रांतीय नागरिकांना रेल्वेने, ७०० वीट भट्टी कामगार, त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त एसटी बस व परप्रांतीय नागरिकांना पाठवण्याचे काम शिरूर तालुका प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांनी केले आहे.
शिरूरला ही या परप्रांतीय व अतिसंवेदनशील भागातील लोकांपासून कोरोना व्हायरस संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. वरील चार भागातील पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी आपली जबाबदारी झटकू नये अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव ,कोरेगाव-भीमा ,सणसवाडी कोंढापुरी ,या भागातील परप्रांतीय कामगारांना (मध्य प्रदेश व उत्तराखंड , छत्तीसगड व इतर राज्याच्या सिमे पर्यन्त पाठवण्यासाठी शिरूर प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांनी एसटी बसची व्यवस्था केली परंतु जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहत, तळेगाव दाभाडे, पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील या अती संवेदनशील भागातील परप्रांतीय शिरूर कडे लोंढेच्या लोंढे येत आहेत.
शिरूरमध्ये चार-पाच तालुका बाहेरील ठिकाणावरून येणाऱ्या परप्रांतीय नागरिकांच्या लोंढा थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत असल्याने शिरूर महसूल प्रशासन चिंतेत पडले आहे. तर या अतिसंवेदनशील भागातून येणारे परप्रांतीय आपल्याबरोबर कोरोना घेऊन शिरूरमध्ये तर येत नाहीना अशी भीती शिरूर शहरातील नागरिकांना वाटत आहे.
तालुका बाहेरील मजुरही शिरूरमधे बससाठी येऊ लागले असुन इतर तालुक्यानेही बसची सोय करावी तसेच पोलिसांनी चोख नाकेबंदी करून रेड झोनमधील नागरीकांना बाहेर पडु देऊ नये, असे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले .
पुणे शहर,तळेगाव दाभाडे पिंपरी-चिंचवड चाकण दौंड या भागात मोठ्या प्रमाणात राजकीय नेते कंपनी कामगार ठेकेदार आहेत परंतु या सर्व रस्त्याने येणाऱ्या परप्रांतीय कामगारांना जेवण सोडाच ,कोणी पाण्याचा ग्लास भरून या राजकीय पुढारी व नेत्यांनी दिला नाही. उलट आपली जबाबदारी ते झटकत असल्याचे दिसून येत आहे.
प्रशांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते