निमोणे (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यात सध्या करोनाचा कहर होऊ लागला आहे. सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे 700 तर शहरात 100 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांची राजकीय पुढार्यांकडुन वेळोवेळी पायमल्ली केली जात आहे. परंतु सर्वसामान्यांना दंडाचा बडगा उगारणारे पोलीस मात्र गर्दी जमवत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविणार्या राजकीय पुढार्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न शिरूर तालुक्यातील जनतेमधून उपस्थित होत आहे.
सध्या सगळीकडेच करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गावोगावी क्रिकेट स्पर्धा, वाढदिवस तसेच राजकीय कार्यक्रम मोठ्या धामधुमीत आयोजित केले जात आहेत. कार्यक्रम आयोजित करताना कसल्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही. तसेच राजकीय पुढार्यांचे वाढदिवस, सभा, लग्न, पुजा तसेच इतर कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली जात आहे. यादरम्यान सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असुन करोनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे. तसेच राजकीय कार्यक्रमात अनेकवेळा लोक मास्क सुद्धा लावत नसुन त्यामुळे करोनाचा फैलाव मोठया प्रमाणावर होत आहे.
साधी विचारपूसही नाही..
शिरूर तालुक्यातील एका गावात एका महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असुन त्यातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु ही घटना घडून आठ दिवस उलटूनही राजकीय नेत्यांनी या पीडित कुटुंबातील व्यक्तींची साधी विचारपूसही केलेली नाही. पीडित कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असुन नुकताच या गटातील जिल्हा परिषद सदस्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त हे जिल्हा परिषद सदस्य शेजारच्या गावात येऊन क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन करुन गेले. मात्र शेजारच्या गावात असलेल्या पीडित कुटुंबातील व्यक्तीची भेट घेण्यास मात्र ते विसरले. त्यामुळे राजकीय पुढारी हे फक्त आमचा मतदानासाठी वापर करतात. मात्र आमच्यावर अन्याय झाल्यावर मात्र आमचे फोन सुद्धा उचलत नाहीत अशी संतापजनक प्रतिक्रिया पीडित कुटुंबाने दिली.
शिरुर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पुढार्यांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात आहेत. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करुन मोठया प्रमाणावर गर्दी जमविली जात असताना पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असुन सर्वसामान्य लोकांनी मात्र मास्क न लावल्यास त्यांच्याकडुन सक्तीने दंड वसुली केली जात आहे. त्यामुळे करोनाचे नियम पायदळी तुडविणार्या राजकीय पुढार्यांना वेगळे नियम आहेत का? असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जात आहे.