शिरूर – शहरातील वृद्ध महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर पुणे येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे, अशी माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे. शिरूर शहरात मुंबईवरून आलेला आणखी एकजण बाधित झाला आहे. बळीपासून दूर राहिलेल्या शिरूरमध्ये मृत्यूने सलामी दिली आहे. वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यामुळे शहरासह तालुका हादरला आहे.
जोशीवाडी भागातील एक वृद्ध महिला शिरूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. तिला त्रास जाणवत असल्याने शिरूर ग्रामीण रुग्णालयातून पुणे ससून रुग्णालयात पाठवले होते. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. मुंबईवरून आलेल्या साडूसोबत त्यांचा मुलगाही संशयित वाटत असल्याने दोघांना पुणे औंध रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. या नागरिकाचे मुंबई येथे (दि.19) चाचणीसाठी नमुने घेतले होते.
त्यानंतर ते पास घेऊन शिरूरमध्ये प्रीतम प्रकाशनगर येथे (दि.27) चारजणांसह दाखल झाले होते. त्यांना (दि.28) होम क्वारंटाइन केले होते. हा रुग्ण मुंबई येथे पॉझिटिव्ह आढळला होता. परंतु रुग्णाचा तपास लागत नव्हता. अखेर हा रुग्ण शिरूर येथे असल्याचे मुंबई येथील आरोग्य विभागाला समजल्यावर शिरूर आरोग्य विभागाला याची माहिती दिली. रुग्णाचा तपास करून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे.