न्हावरे(प्रतिनिधी) : करोनामुळे चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊनच्या काळात शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे ४८३ व्यक्ती विविध शहरांतून व दूर गावांवरुन आलेल्या आहेत. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा व्यक्तींना त्या राहत असलेल्या घरात किंवा शाळांमध्ये स्थानिक प्रशासनाने क्वारंटाइन केले आहे. याबाबतची माहिती तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी दिली.
विशेष म्हणजे शिरूरच्या पूर्व भागातील २३ गावांपैकी मोठमोठ्या गावांमध्ये बाहेर गावांवरून आलेल्या स्थानिकांबरोबरच आयात झालेल्या पै-पाहुण्यांची संख्याही सर्वाधिक आहे. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये व परिसरात भीतीचे वातावरण आहे.कारण,तालुक्यात सापडलेले अनेक रुग्ण हे बाहेरूनच आलेले आहेत.
तसेच स्थानिक प्रशासनाने बाहेरगावावरुन येणाऱ्या स्थानिक नागरिकांना गावात घेण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र, त्यांनी क्वारंटाइन होणे आवश्यक आहे. असे सांगितले आहे. परंतु,पै-पाहुण्यांनी त्यांच्या मूळगावी जावे असा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे.असे असताना अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी व आशा वर्कर्स बाहेरून आलेल्या लोकांची माहिती गोळा करण्यासाठी गेले असता, त्यांना अनेकदा स्थानिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते. तर कधी ग्रामस्थांकडून त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते.असे प्रकार गावांमध्ये सर्रास घडत आहेत. अशा वेळी संबंधित ग्रामस्थांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी स्थानिक प्रशासन व आशा वर्कर्स यांच्याकडून होत आहे.
त्याचप्रमाणे शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागात दुकानांमध्ये सोशल डिस्टंसींग पाळले जात नाही. अनेक ठिकाणी दुचाकीवर मास्कचा वापर न करताना युवक फिरताना दिसत आहेत. त्यामुळे अशा दुचाकीस्वारांना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून कारवाई करावी अशीही मागणी होत आहे.
शिरूरच्या पूर्व भागात गावनिहाय क्वारंटाइन करण्यात आलेल्या व्यक्ती…
१) न्हावरे – १००
२) मांडवगण फराटा – ९१
३) वडगाव रासाई – ५६
४) शिरसगाव काटा – ४४
५) रांजणगाव सांडस – ३१
६) पिंपळसुटी- ३२
७) उरळगाव – २६
८)निर्वी – १५
९) कुरुळी – १३
१०) नागरगाव – ११
११) निमोणे – १०
१२) आलेगाव पागा – ९
१३) इनामगाव – ९
१४) कर्डे – ७
१५) चव्हाणवाडी – ६
१६) चिंचणी – ५
१७) गणेगाव दुमाला – ५
१८) आंबळे – ४
१९) आंधळगाव – ४
२०) गुनाट – ४
२१) तांदळी – १
२२) शिंदोडी – ०
२३) कोळगाव डोळस – ०