शिरूर -शिरूर शहरात करोना रुग्णांची वाढ होत आहे. हा धोका ओळखून शिरूर प्रांत दादासाहेब कांबळे यांनी दि. 19 ते 28 जुलै यादरम्यान शिरूर शहर पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे आदेश काढले आहेत.
शिरूर नगर परिषदेच्या वतीने सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, मुख्याधिकारी महेश रोकडे व स्वच्छता व आरोग्य सभापती विठ्ठल पवार, नळ पाणीपुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी यांच्या वतीने आज शहरात रिक्षा फिरवून लॉकडाऊनबाबत निवेदन करण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात करोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, विनाकारण शहरात फिरणारे, मास्क न वापरणारे, टू व्हीलरवर एकपेक्षा जास्त लोक असणारे, नगर जिल्ह्यातील नागरिक शहरात आढळल्यास या सर्वांवर 188 कलमाखाली दंडात्मक कारवाई व आपत्कालीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिला आहे.