मनपा, खासगी रुग्णालयांकडून मनःस्ताप : तपासणी अहवालातही गोंधळात गोंधळ
– चंद्रकांत जगधने
वडगावशेरी – महानगरपालिका स्वॅब सेंटर आणि खासगी हॉस्पिटलच्या लॅबमध्ये करोना चाचण्यांच्या अहवालाचा गोंधळ झाला. यामुळे एका करोनाबाधित मुलास आपल्या आजारी पित्यास घेऊन उपचारासाठी शहरभर फिरावे लागले. सहायक आरोग्यप्रमुखांनी सूचना केल्यानंतर सायंकाळी उशिरा अत्यवस्थ वडिलांना एका खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला.
वडगावशेरी येथील एका मुलाने 57 वर्षीय आजारी वडिलांना खोकला व श्वसनास त्रास होत असल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे करोना चाचणी करण्यात आली. मात्र, हॉस्पिटलच्या लॅबकडून अहवाल वेळेवर मिळाला नाही. वडिलांची तब्येत खालावल्याने तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जा,’ असे सांगण्यात आले. याच कालावधीत मुलाने मनपाच्या स्वॅब सेंटरमधून स्वत:ची आणि वडिलांची स्वॅब चाचणी पुन्हा करून घेतली. त्यावेळी वडिलांचा अहवाल निगेटिव्ह, तर त्याचा करोना पॉझिटिव्ह आला. त्यावेळी मुलाने खासगी हॉस्पिटलमध्ये केलेल्या वडिलांच्या चाचणीचा अहवाल मिळवला. त्यामध्ये वडील पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले होते. यात वेळ गेल्याने वडिलांची तब्येत खालावली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवायचे असल्याने बाधित अवस्थेतच मुलाने नव्या हॉस्पिटलची शोधाशोध सुरू केली.
परंतु, खासगीच काय तर मनपाच्या कोणत्याही रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे सांगितले गेले. अखेर, मुलाने ही माहिती “प्रभात’ प्रतिनिधींना कळविली. त्यांनी नगररोड क्षेत्रीय अधिकारी राजेश बनकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. बडे यांच्याशी बोलल्याचे व त्यांच्याशी संपर्क करावा, असे सांगितले.
तीन तास रुग्णवाहिकेतच
कात्रज येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. बडे यांनी सांगितल्यानंतर करोनाबाधित मुलाने रुग्णवाहिकेतून वडिलांना नेत हॉस्पिटल गाठले; परंतु असा कोणताच निरोप आरोग्य अधिकाऱ्यांकडून आलेला नसून बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. करोनाबाधित असलेल्या मुलाचा प्राण गळ्यापर्यंत आला होता, अशाही अवस्थेत तो विनवण्या करत राहिला. त्यावेळी तब्बल तीन तास आजारी वडील रुग्णवाहिकेतच झोपून होते.
…अन् मुलगाही दाखल
वडिलांवर उपचार सुरू होताच मुलाच्या जीवात जीव आला; परंतु स्वत: करोनाबाधित असल्याने वडिलांना ऍडमिट करून तो रात्री 12च्या सुमारास खराडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाला.
50 हजार रु. डिपॉझिट भरा, मगच उपचार
“वडिलांना ऍडमिट करायचे असेल तर 50 हजार रु.डिपॉझिट करा, त्यानंतर बेड उपलब्ध झाल्यावर तुम्हाला सांगितले जाईल,’ असा निरोप सायंकाळच्या सुमारास हॉस्पिटलकडून मुलास मिळाला. दरम्यानच्या काळात “प्रभात’ प्रतिनिधीने वारंवार हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला. अखेर मनपा सहायक आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी “संबंधित रुग्णास तत्काळ बेड उपलब्ध करून द्यावा. महात्मा फुले योजनेंतर्गत तातडीने उपचार द्यावेत,’ अशी सूचना केल्याने आजारी वडिलांवर उपचार सुरू झाले.