जळोची -पुणे जिल्हा परिषदेचे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कोविड उपचार केंद्र व विलगीकरण केंद्रावर नियुक्ती केल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेतून सूट असलेल्या अनेक अपंग शिक्षकांचा तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या प्राथमिक शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या कामाचा शिक्षकांना अनुभव नाही. त्यामुळे हे आदेश रद्द करावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशव जाधव यांनी केली आहे.
कोविड केंद्र व विलगीकरण केंद्रात प्रतिबंधात्मक उपाययोजनेस सहकार्य व्हावे, याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून 50 वर्षे वयाच्या आतील 50 प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिक्षकांना यासंदर्भात कसलेही प्रशिक्षण मिळाले नाही. सद्यस्थितीत शालेय कामकाज सुरू असून विद्यार्थ्यांचे गुगल क्लासरूम तयार करणे, ऑनलाइन अभ्यास देणे, त्याची पडताळणी करणे, आदी कामे शिक्षक करीत आहेत.
यापूर्वी शिक्षकांनी करोना सर्वेक्षण, रेशनिंगवरील धान्य वाटपाचे सनियंत्रण, चेकपोस्ट सांभाळणे आदी कामे केली आहेत. त्यामुळे उपचार व विलगीकरण केंद्रातील नियुक्ती आदेश रद्द करण्याबाबतची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांना निवेदन देण्यात आले आहेत.